प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी उसळला जनसागर

0
24

>> गर्दी नियंत्रणाबाहेर; तूर्त अयोध्येत मोठ्या संख्येने न येण्याचे पोलिसांकडून भाविकांना आवाहन

देशवासियांचे तब्बल 500 वर्षांचे स्वप्न सोमवारी पूर्ण झाले आणि रामलल्ला अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामाच्या मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोमवारी या सोहळ्यासाठी मंदिरात उपस्थित असलेल्या दिग्गजांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर कालपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. काल पहाटेपासूनच रामभक्तांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, अयोध्येत भाविकांची इतकी मोठी गर्दी झाली आहे की, पोलिसांनी भाविकांना अयोध्येत न येण्याचे आवाहन केले आहे.

श्रीरामाचे सोमवारी अयोध्या नगरीत आगमन झाले. तो बहुप्रतीक्षित अभिषेक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. वेदमंत्रांच्या घोषात सोमवारी दुपारी 12.50 वाजताच्या मुहूर्तावर हा सोहळा संपन्न झाला. या 51 इंच उंचीच्या सजवलेल्या सावळ्या राममूर्तीचे दर्शन होताच जगभर रामनामाचा जयघोष सुरू झाला. प्रभू रामचंद्रांचे ‘याचि देहि याचि डोळा’ दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महासागर उसळला आहे. मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी पोलिसांनी बॅरिकेट्स हटवल्यानंतर भक्तांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर गर्दी इतकी वाढत गेली की, पोलीस आता मर्यादित संख्येने आणि टप्प्याटप्याने भाविकांना मंदिर परिसरात सोडत आहेत. सकाळपासून भाविकांमध्ये धक्काबुक्कीच्या अनेक घटना घडल्या.

मंदिराबाहेर भक्तांची इतकी गर्दी जमली आहे की, अनेक ठिकाणी दुभाजक तुटले आहेत, बॅरिकेट्स मोडले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिक पोलीस कुमक अयोध्येत बोलावण्यात आली आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुजीत पांडेय यांना देखील सकाळी अयोध्येत धाव घ्यावी लागली.

अयोध्येत लोटलेला जनसागर पाहून पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्ते वळवले आहेत. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 2 आठवडे आधी अयोध्येतील सर्व हॉटेल्समध्ये 80 टक्के बुकिंग्स फुल्ल झाले आहेत. येथील हॉटेलांमध्ये एक दिवस राहण्यासाठी पाच टक्के अधिक पैसे द्यावे लागत आहेत. काही आलिशान खोल्यांच्या किमती 1 लाखांपर्यंत गेल्या आहेत.