भारत जोडो न्याय यात्रेवरील हल्ल्याचा गोवा काँग्रेसकडून निषेध

0
13

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर रविवारी आसाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल काँग्रेस पक्षाने येथील काँग्रेस भवनसमोर निदर्शने करीत आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सर्मा यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांच्या नेतृत्त्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हिमंता बिस्वा सर्मा यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अमित पाटकर म्हणाले की, राहुल गांधी हे भारतातील लोकांना न्याय मिळावा यासाठी भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठीच या यात्रेवर आसाममध्ये हल्ला करण्यात आला. हिमंता बिस्वा सर्मा यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी काँग्रेसने आवाज उठवल्यामुळे ते चिडले असून, त्याचीच परिणती या हल्ल्यात झाली आहे. मोदी सरकारचे रामराज्य ते हेच काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेनकुमार बोहरा, तसेच काँग्रेसचे केंद्रीय नेते जयराम रमेश यांच्या वाहनांवर झालेला हल्ला ही गंभीर बाब असून, आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहोत, असे पाटकर यावेळी म्हणाले. यावेळी आमदार कार्लुस फेरेरा यांनी यात्रेवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध केला.