राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर आसाममध्ये हल्ला

0
15

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 14 जानेवारी रोजी मणिपूर राज्यातून भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात केली. ही यात्रा सध्या आसाममध्ये असून दि. 25 जानेवारी पर्यंत ही यात्रा आसामच्या विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. मात्र काल आसामच्या सुनीतपूर भागातील जमुगुरीघाट येथून प्रवास करत असताना यात्रेवर हल्ला झाला असून भाजप समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केला आहे. रमेश यांनी, आम्ही जमुगुरीघाट येथून जात असताना भाजपचे झेंडे हाती धरलेल्या एका अनियंत्रित जमावाने माझ्या गाडीला घेरले. त्यांनी गाडीला लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर फाडून टाकले. तसेच यात्रेविरोधात घोषणाबाजी केली आणि गाडीच्या काचेवर पाणी फेकल्याचा आरोप केला.

या घटनेनंतर सोनितपूरच्या पोलिसांनी काँग्रेसच्या ताफ्यावर काहींनी हल्ला केला असून त्या प्रकरणी आम्ही चौकशी करत असल्याचे सांगितले. शनिवारी (दि. 20 जानेवारी) खासदार जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सर्मा यांच्यावर टीका केली होती. आसामचे भाजपाच सरकार आमच्या यात्रेमध्ये अडचणी निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतेच ज्या मार्गाने गुवाहाटीला प्रवास केला होता, त्या मार्गावरून आमचीही यात्रा शांतपणे जाऊ द्यावी, अशी मागणी जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केली होती.