युवकांना प्राधान्य देणार : केजरीवाल

0
24

आम आदमी पार्टी गोव्यातील राजकीय क्षेत्रात नवीन युवा प्रतिभेला संधी देणार आहे, असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोनापावल पणजी येथे घेण्यात आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना काल सांगितले. आपच्या स्वयंसेवकांना इतर पक्षाच्या नेत्यांवर लक्ष केंद्रित न करण्याचे आवाहन केले. परंतु, पक्षासाठी लोकांचा विश्वास संपादन केलेले, विश्वासू नवीन चेहऱ्यांना पक्षाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. गोव्यात पक्षाने आत्तापर्यंत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. आपचे नेते इतर पक्षाच्या आमिषांना बळी पडत नाहीत. आपच्या पंजाब सरकारमधील 80 आमदार देखील नवीन चेहरे आहेत, ज्यामुळे नवीन प्रतिभा विकसित करण्याच्या पक्षाच्या बांधीलकीला बळकटी मिळत आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

राजकारण ही पूर्णवेळ बांधीलकी आहे. गोव्यातील राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झालेली आहे. आपच्या नेते आणि स्वयंसेवकांना एक व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम करण्याची गरज आहे. नागरिकांशी भावनिक संबंध निर्माण करून आव्हानात्मक काळात आधार देण्याचे आवाहन केले. गोवा विधानसभेच्या 2027 च्या निवडणुकीत आपचे सरकार सत्तेवर आणण्याचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.