12 सदस्यीय स्वयंपूर्ण गोवा मंडळ स्थापन

0
4

>> गोव्याला स्वावलंबी बनवण्यासाठी रणनीती, धोरणे ठरवणार

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय स्वयंपूर्ण गोवा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. गोव्याला स्वावलंबी बनवण्यासाठी रणनीती आणि धोरण निश्चिती हा स्वयंपूर्ण गोवा मंडळ स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाला चालना देण्यासाठी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली होती.

प्रधान सचिव/सचिव (नियोजन आणि सांख्यिकी), प्रधान सचिव/सचिव (वित्त), जुने गोवे येथील आयसीएआर प्रतिनिधी, नाबार्ड प्रतिनिधी, पंचायत संचालक, कृषी संचालक, महापालिका प्रशासन संचालक, आदिवासी कल्याण संचालक, प्रधान मुख्य अभियंता ( सार्वजनिक बांधकाम खाते), सदस्य सचिव (गोवा राज्य जैव विविधता मंडळ) यांची या मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयाचे संचालक काम पाहतील.
गोव्याला स्वावलंबी बनवण्यासाठी धोरणे, धोरणांची व्याख्या करणे, समाजातील गरजू व्यक्ती आणि त्यांची स्वयंरोजगाराची क्षमता ओळखणे, कौशल्य विकासाच्या दिशेने कार्यक्रम आणि योजनांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अमार्ग आणि साधने सुचविणे, केंद्र आणि राज्याच्या योजनांचे स्वयंपूर्ण मित्रांमार्फत नियोजन, विविध स्तरांवर स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या प्रगतीचे निरीक्षण करणे, स्वयंपूर्ण मित्रांना मार्गदर्शन करणे, आवश्यक असेल तेव्हा गावांमध्ये पाहणी, क्षेत्रभेटी घेणे, आवश्यक असल्यास कोणतीही उपसमिती स्थापन करणे आदी कार्य करण्याची जबाबदारी मंडळाची आहे.

स्वयंपूर्ण गोवा मंडळाची एका तिमाहीत किमान एकदा बैठक घेतली जाणार आहे. मंडळाने नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांना मंडळाच्या बैठकींना उपस्थित राहण्यासाठी किंवा मंडळाने नेमून दिलेल्या कोणत्याही कामात सहभागी होण्यासाठी भत्ता दिला
जाणार आहे.