पाकिस्तानला दणका

0
34

इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी तळांवर द्रोन व क्षेपणास्रांद्वारे हल्ला चढवल्याची वार्ता काल आली आणि ह्या नव्या अकल्पित संघर्षाने जगाचे लक्ष वेधले. इराण हा शियापंथीय देश असला तरी त्याचे आजवर पाकिस्तानशी चांगले संबंध राहिले आहेत. पाकिस्तान भारतापासून वेगळे झाले तेव्हा त्याला मान्यता देणारा पहिला देश इराणच होता. पाकिस्तानचा पहिला दूतावासही इराणमध्ये उघडला गेला होता. इराणमध्ये कच्चे तेल व नैसर्गिक वायूचे भांडार असल्याने पाकिस्तानने इराण पाकिस्तान गॅसवाहिनीसंदर्भात 2012 साली त्याच्याशी करारही केला होता. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे ते काम पुढे सरकू शकले नाही. मात्र, पाकिस्तानच्या भूमीत फोफावलेले सुन्नी दहशतवादी गट इराणला गेली अनेक वर्षे त्रास देत आले आहेत. कालचा हल्ला हा जैश अल अद्ल ह्या यापैकी सर्वांत प्रबळ दहशतवादी गटाला शह देण्यासाठी इराणने केला. त्यासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीत घुसण्यासही त्याने मागेपुढे पाहिले नाही. गेल्या महिन्यात ह्या दहशतवादी संघटनेने पाकिस्तान – इराण सीमेपलीकडील रस्क येथे इराणी पोलीस स्थानकांवर हल्ले चढवून अकरा पोलिसांना ठार केले होते. त्याचा सूड इराणने ह्या कारवाईद्वारे उगवलेला दिसतो. पाकिस्तानकडून दहशतवादाची पाठराखण केली जाते हे तर भारत सतत अनुभवत आला आहे. इराणलाही हा अनुभव गेली अनेक वर्षे येत राहिला आहे. पूर्वी इराणमधील सुन्नींच्या हक्कासाठी लढणारी जुंदुल्लाह ही दहशतवादी संघटना त्या देशात घातपात घडवीत असे. इराणनने त्या जुंदुल्लाहचा नेता अब्दुल मलीक रिगी ह्याचा 2010 साली खात्मा केला. त्यामुळे जुंदुल्लाह नामशेष झाली, परंतु तिच्याशी संबंधित दहशतवाद्यांनी वेगवेगळे गट उभारून इराणमध्ये घातपात घडवणे सुरूच ठेवले आहे. जैश अल अद्ल हा असाच एक दहशतवादी गट आहे, ज्याचा मुख्य तळ पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये आहे. इराणने वेळोवेळी पाकिस्तानला त्याबाबत इशारे दिले होते. इराणचा भूगोल पाहिला तर लक्षात येईल की त्याच्या पश्चिमेला जसे इराक व तुर्किये हे देश आहेत, उत्तरेला अजरबैजान, कॅस्पियन समुद्र आणि तुर्कमेनिस्तान आहेत, तसेच पूर्वेला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमाही त्या देशाला भिडते. पाकिस्तानची सुमारे नऊशे किलोमीटरची सीमा अरबी सागरापासून सुरू होते आणि अफगाणिस्तानपर्यंत जाते. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून जाणाऱ्या ह्या सीमेवरून होणारी तस्करी, अमली पदार्थ व्यवहार ही इराणसाठी मोठी डोकेदुखी राहिली आहे. ही तस्करी सुलभ व्हावी यासाठी पोलीस ठाण्यांवर दहशतवादी हल्ले चढवले जात असतात. ह्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या आयएसआय आणि लष्कराचे अर्थातच समर्थन आहे. ज्या कोह ई सब्झ येथील तळांवर इराणने काल हल्ला केला, ते त्या दहशतवादी संघटनेचा एकेकाळचा नेता मुल्ला हाशीमचे गाव. हा हाशीम 2018 मध्ये मारला गेला, पण तेथील दहशतवादी तळ अजून कायम आहेत. इराणने केलेल्या द्रोन व क्षेपणास्र हल्ल्यात मुले ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला असला तरी जैश अल अद्लच्या दहशतवाद्यांच्या घरांवरील हे हल्ले होते हे जैशनेच कबूल केले आहे. हा प्रत्यक्ष संघर्ष टळावा यासाठी इराणकडून पाकिस्तानला वेळोवेळी समज दिली जात होती. चार वर्षांपूर्वी मेजर जनरल महंमद अली जाफरी यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षांना, हसन रुहानींना पाकिस्तानातून होणाऱ्या ह्या दहशतवादी उपद्रवाचा बंदोबस्त करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानंतर रुहानी स्वतः तत्कालीन पंतप्रधान इम्रान खानशी बोलले होते. त्यानंतर शाहबाज शरीफ अफगाणिस्तानच्या भेटीवर गेले होते तेव्हाही ह्याबाबत चर्चा झाली होती. परंतु पाकिस्तान राजकीय अस्थैर्यात सापडलेला असल्याने त्यावर कार्यवाही झाली नाही. शिवाय पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे अशा दहशतवादी गटांना असलेले समर्थन सर्वविदित आहे. जैश अल अद्लचा संंबंध अल कायदाशीही होता आणि सलाहुद्दिन फारुकी आणि मुल्ला उमर हे ह्या दहशतवादी गटाचे नेते आहेत हे लक्षात घेता पाकिस्तान त्यावर कारवाईस का तयार नाही ह्याचे कोडे उलगडते. इराणमध्ये गेल्या महिन्यात भीषण स्फोटात नव्वद लोक ठार झाले होते. त्यानंतर इराणने आपल्या विरोधकांविरुद्ध आक्रमक मोहीम उघडली आहे. इस्रायलही त्यातून सुटलेला नाही. इराक आणि सीरियामध्येही त्यांनी हल्ला चढवला, तसाच आता पाकिस्तानातही भारताप्रमाणे थेट घरात घुसून दणका दिला आहे. दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दोन्ही देशांचे नेते भेटीगाठी घेत असताना हा हल्ला झाल्याने पाकिस्तानचा तिळपापड उडाला आहे. आता हा दोन्ही देशांतला तणाव निवळणार की चिघळणार हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.