>> पणजी महापालिकेच्या बैठकीत विरोधी नगरसेवकांची मागणी
काल झालेल्या पणजी महापालिकेच्या बैठकीत विरोधी गटातील नगरसेवकांनी पणजी स्मार्ट सिटीच्या कामाचे लेखापरीक्षण व सखोल चौकशी केली जावी, अशी जोरदार मागणी केली. महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी कामांच्या विषयावरून बैठकीत बराच गदारोळ झाला.
पणजी स्मार्ट सिटीच्या सल्लागाराची गोवा सरकारने चौकशी करावी. या सल्लागाराला त्याच्या कामासाठीचे 8 कोटी रुपये फेडण्यात आले आहेत; मात्र त्या दिवसापासून हा सल्ला गायबच झाला असल्याचा आरोप माजी महापौर उदय मडकईकर यांनी केला.
स्मार्ट सिटीचे जे काम सध्या चालू आहे, त्या कामांच्या दर्जाचे लेखापरीक्षण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी करावे, अशी मागणी मडकईकर यांनी केली. विशेषकरून भूमिगत वाहिन्यांच्या कामांचे विनाविलंब लेखापरीक्षण करावे, असे मडकईकर म्हणाले. वाहिन्या घातल्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम व्यवस्थितरित्या केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कामांकडे आत्ताच योग्यरित्या लक्ष देण्यात आले नाही, तर पुढे खूप समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्मार्ट सिटीच्या कामात लक्ष घातले आहे. येत्या 30 मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामात सुधारणा होईल, असा विश्वास महापौर रोहित मोन्सेरात यांनी व्यक्त केला.