पणजीतील खासगी बसगाड्यांबाबत 19 जानेवारीपूर्वी निर्णय ः मुख्यमंत्री

0
30

बसमालक संघटनेने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पणजी महानगरपालिका आणि आसपासच्या भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांच्या प्रश्नावर येत्या 19 जानेवारी 2024 पूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खासगी बसमालकांना दिले आहे, अशी माहिती अखिल गोवा बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यांनी काल दिली.

पणजी परिसरातील खासगी बसमालकाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली समस्या मांडली. राज्य सरकारच्या वाहतूक खात्याने पणजी महानगरपालिका व आसपासच्या भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्या बंद करण्याची नोटीस जारी केली आहे. या नोटीसनुसार या परिसरात गेली कित्येक वर्षे प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी प्रवासी मालकासमोर भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी बसमालकांनी राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेणाऱ्या पाच हरकती सादर केल्या आहेत, असे ताम्हणकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रभावीत होणाऱ्या खासगी बसमालकांशी शिष्टमंडळाची या विषयावर चर्चा केली असून येत्या 19 जानेवारीपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे ताम्हणकर यांनी सांगितले.
पणजीतील खासगी बसगाड्या कदंब महामंडळाच्या माझी बस योजनेत समाविष्ट करून घेतल्या जाणार आहेत. या बसगाड्या विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात, अशी माहिती बसमालकांना देण्यात आली आहे. ह्या पर्यायी व्यवस्थेबाबत बसमालकांनी नापसंती व्यक्त केली असून राज्य सरकारला आवश्यक असलेल्या इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. बसगाड्या बंद करण्याच्या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या खासगी प्रवासी बसमालकांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी ताम्हणकर यांनी केली.