काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू

0
13

मणिपूरमधून यात्रेला आरंभ; राहुल गांधीची केंद्र सरकार, मोदींवर टीका

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची काल मणिपूरमधून सुरुवात झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमधील थौबल जिल्ह्यात या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांचे विशेष विमान रवाना मणिपूरच्या दिशेने रवाना झाले होते. यामध्ये सलमान खुर्शीद, राजीव शुक्ला, आनंद शर्मा, रणदीप सिंह सुरजेवाला, अशोक गहलोत, अभिषेक मनु सिंघवी, भूपेंद्र सिंह हुड्डा, सचिन पायलट, दिग्विजय सिंह, प्रमोद तिवारी यांच्यासह जवळपास 70 काँग्रेसचे नेते राहुल गांधींसह मणिपूरमधील इंफाळ येथे पोहचले.
मणिपूरपासून सुरू झालेली काँग्रेसची ही यात्रा 6712 किलोमीटरचा प्रवास करुन 20 मार्चला मुंबईत संपणार आहे.
यावेळी राहुल गांधी 60-70 काँग्रेस नेत्यांसह बसने हे अंतर पार करतील. महत्त्वाच्या ठिकाणी पायी प्रवास करण्यात येणार आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा हा दुसरा भाग आहे.

दरम्यान पहिल्या टप्यात कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करण्यात आला होता. त्यावेळी 3500 किलोमीटरची ‘भारत जोडो यात्रा’ 12 राज्यांमधून गेली. त्याचबरोबर ‘भारत जोडो न्याय यात्रा’ 15 राज्यांचा समावेश करणार आहे.
राहुल गांधी हे 67 दिवसांच्या प्रवासात 110 जिल्ह्यांना भेट देतील. या यात्रेत लोकसभेच्या 355 जागांचा समावेश असेल, जे देशातील एकूण संसदीय जागांपैकी 65% आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या 355 जागांपैकी 236 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 14 जागा जिंकण्यात यश आले.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधूनही ही यात्रा जाणार आहे, जिथे काँग्रेसचा नुकताच पराभव झाला आहे. आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधताना मणिपूरमध्ये भाऊ, बहिणी, आई-वडील मारले गेले, पण आजपर्यंत तुमचे अश्रू पुसण्यासाठी पीएम मोदी आले नाहीत, ही शरमेची बाब असल्याचे सांगितले.

यात्रेचा प्रवास

भारत जोडो न्याया यात्रेचा प्रवास हा मणिपूरमधून सुरु झाला असून पुढे नागालँड, आसाम आणि अरुणाचलसह देशातील 15 राज्यांमधून जाणार आहे. त्यानंतर या यात्रेचा शेवटचा टप्पा हा मुंबई असेल. 110 जिल्ह्यांतून जाणारी ही यात्रा लोकसभेच्या 100 आणि विधानसभेच्या 337 जागांचा समावेश करेल. सुमारे 6700 किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत या यात्रेचा शेवट होणार आहे.