खाण कंपन्यांना मुद्रांक शुल्कात दिलासा देणार

0
10

राज्यातील खाण व्यवसाय लवकर सुरू होण्यासाठी खाण कंपन्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी थोडी सूट देण्यावर विचारविनिमय केला जाणार आहे. खनिज पट्टेधारकांसाठी दर दहा वर्षांनी मुद्रांक शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यावर विचार केला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. गोवा खनिज निर्यातदार असोसिएशन आणि गोवा खाण असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी राज्याचा आर्थिक विकास, तसेच ट्रक, बार्जेस, दुकानदार आदी पूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी खाण व्यवसाय तातडीने सुरू करण्याची मागणी दोन्ही संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज्यातील खाण क्षेत्राची वाढ आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी खाण उद्योग संघटनांनी मुद्रांक शुल्क आकारणी तर्कसंगत करण्याची सरकारला विनंती केली आहे. राज्य सरकारच्या खाण खात्याने नव्याने केलेल्या 9 खनिज पट्ट्यांच्या लिलावाशी संबंधित मुद्रांक शुल्काच्या तरतुदींबद्दल खाण संघटनांनी चिंता व्यक्त केली.