राज्यात एका धक्कादायक घटनेची नोंद झाली असून एक मृत घोषित केलेली व्यक्ती दोन महिन्यांनी सुखरूप घरी परतली आहे.
पणजी पोलिसांना 7 ऑक्टोबर 2023 रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याच काळात आगशी येथील मिलाग्रेस (वय 59) नामक व्यक्ती बेपत्ता झाली होती. पणजी पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची माहिती मिलाग्रेस यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी बांबोळी येथे इस्पितळात मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर आवश्यक सोपस्कार पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला होता. कुटुंबीयांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. आता घटनेच्या दोन महिन्यांनंतर, मिलाग्रेस सुखरूप घरी परतल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. पणजी पोलिसांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला त्यांच्या रेकॉर्डमध्ये संबंधित बदल करण्याची विनंती केली आहे. बेपत्ता मिलाग्रेस मागील दोन महिने कुठे होता याबाबत सविस्तर माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही.