गोवा मानवाधिकार आयोगाने मळा-पणजी येथे नववर्षाच्या पहिल्या दिवशी झालेल्या अपघातातील युवकाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पणजी स्मार्ट सिटी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडून येत्या 15 जानेवारीपर्यंत अहवाल मागवला आहे.
मळा-पणजी येथे स्मार्ट सिटी अंतर्गत मलनिस्सारण वाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात 1 जानेवारीला पहाटेच्या वेळी दुचाकीसह पडल्याने रायबंदर येथील आयुष हळर्णकर (21) याचा मृत्यू झाला होता. गोवा मानवाधिकार आयोगाने या अपघाती मृत्यू प्रकरणी प्रसारमाध्यमांतील वृत्तांची स्वतःहून दखल घेत इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांना नोटीस बजावून येत्या 15 जानेवारीपर्यंत अहवाल किंवा उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हा अपघात झाल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आता, अपघात स्थळी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना धोक्याची सूचना देण्यासाठी विजेची व्यवस्था करण्यात आली.