राज्य सरकारने रिवण-सांगे येथील जमीन आयआयटी संकुलासाठी निश्चित केली आहे. त्यासंबंधीचे पत्र केंद्रीय मंत्रालयाला पाठविण्यात आले असून, केंद्राच्या होकाराची वाट पाहत आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्राची मंजुरी मिळाल्यावर राज्य सरकार जमीन सुपूर्द करणार आहे. आयआयटी संकुलाचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या मंत्रालयात सर्वोच्च स्तरावर ठेवण्यात आला आहे आणि तो मंजूर केला जाईल, अशी माहिती आयआयटी गोवाचे संचालक प्रा. बी. के. मिश्रा यांनी दिली.
राज्य सरकारने सांगे तालुक्यातील रिवण येथील 10 लाख चौरस मीटर जमीन आयआयटी संकुलासाठी राखीव ठेवली आहे. जागा निवड समितीने आयआयटी संकुलासाठी निवडण्यात जागेची डिसेंबर महिन्यात पाहणी केली असून, त्या जागेला तत्त्वत: मान्यता दिली आहे.