त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा

0
18
  • रमेश सावईकर

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीगुरुदेव दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा केला जातो. यंदा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी असल्याने त्या दिवशी ‘दत्तजन्मोत्सव’ महाराष्ट्र व गोवा राज्यांतील दत्ताची स्थाने व दत्तमंदिरांत साजरा केला जाईल.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्रीगुरुदेव दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा केला जातो. यंदा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी असल्याने त्या दिवशी दत्तजन्मोत्सव महाराष्ट्र व गोवा राज्यांतील दत्ताची स्थाने व दत्तमंदिरांत साजरा केला जाईल.
दत्तजयंती दिनी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ होतो, अशी दत्तभक्तांची दृढ भावना व श्रद्धा आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपदी आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्रीगुरुदेव दत्त!
मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्तदर्शन केल्याने भक्तांचे मनोरथ पूर्ण होते असे मानले जाते. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यांना ‘दैत्य’ म्हटले जात असे. देवगणांचे या आसुरी शक्तींना नष्ट करण्याचे प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रूपांत दत्ताला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस ‘दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात. दत्तजयंतीला दत्ततत्त्व पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत शंभर पटीने कार्यरत असते म्हणून या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ होतो, असे मानले जाते. दत्तजयंती साजरी करण्यासंबंधी विशिष्ट असा धार्मिक विधी शास्त्रात सांगितलेला नाही.
या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण म्हणजे गुरुचरित्र सप्ताह करण्याचा प्रघात आहे. दत्तमंदिरामध्ये तसेच दत्ताच्या तीर्थक्षेत्रस्थानी श्रीदत्त जन्मसोहळा, भजन, कीर्तन, आरत्या, श्रीदत्तपूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचे प्रसादवाटप करतात.
दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे. ‘दत्तात्रेय’ हा शब्द ‘दत्त’ व ‘आत्रेय’ अशा दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशा त्रिगुणांची अनुभूती ज्याला आहे असा आणि ‘अत्रेय’ म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्रीदत्त हे अत्री ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो.
अत्री ऋषीनी पुत्रप्राप्तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. अत्री ऋषींच्या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रगट झाले. अत्री ऋषीनी त्यांना पुत्ररूपाने आपल्या उदरी जन्म घ्यावा अशी विनवणी केली. तिन्ही देवांनी ती मान्य केली. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम व दुर्वास हे तीन पुत्र व शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली.
नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथे दत्तात्रेयाचे मंदिर आढळते. चित्रकुटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयाची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. ते भगवान ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांचे (दैवीशक्ती) प्रकटीकरण होय. या तीन दैवीशक्ती या विश्वाची निर्मिती, निरंतरता आणि विनाश दर्शवितात. दत्तात्रेयानी पृथ्वीला आपला पहिला गुरू मानला. ते तिची स्थिरता, संयम आणि निस्वार्थता यांतून शिकले. हवा सर्वव्यापी असल्याचे आणि तरीही कशाशीही संलग्न न होण्याचे महत्त्व ते हवेतून शिकले. आकाशातून विशालता आणि अमर्यादतेचे तत्त्व समजले. दत्तात्रेय हा सर्वसामान्यपणे विष्णूचा अवतार मानला जातो. मार्कंडेय पुराणातील वर्णनावरून तो मूलतः शाक्त तांत्रिक देव असावा असे दिसते. त्रिपुरारहस्यात मदिरा व मदिराक्षीसमवेत रंगलेला दत्तात्रेय आढळतो.

वेद, कर्मकांड व चातुर्वर्ण्य यांचे विष्णूने दत्तावतारात पुनरुज्जीवन केल्याचे ब्रह्मपुराणात म्हटले आहे. शंकर हा दत्ताचा गुरू असल्याचाही निर्देश त्यात आहे. भागवतात अवधूतांचे चौवीस गुरू सांगितले आहेत. पुढे हेच चौवीस गुरू दत्तात्रेयाचेही गुरू म्हणून ओळखले जाऊ लागले व दत्तचरित्रात ते कायमचे प्रविष्ट झाले.
शांडिल्योपनिषद, जबलादर्शनोपनिषद व दत्तोत्रेयोपनिषद यांतही दत्तात्रेयाचे माहात्म्य वर्णिले आहे. पुराणात भार्गव, परशुराम, अलर्क, कार्तवीर्य सहस्रार्जुन, प्रल्हाद, यदू व आयू हे दत्तात्रेयाचे शिष्य असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूर व पांचाळेश्वर ही दत्तात्रेयाची विहारस्थाने मानली जातात. त्याने विविध कारणांस्तव सोळा अवतार घेतले अशी समजूत आहे. दासोपंत, श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोटकर स्वामी आणि माणिक प्रभू या सत्पुरुषांनाही दत्तात्रेयाचेच अवतार मानले जाते.
एक हजारच्या सुमारास ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या अंशात्मक स्वरूपात दत्तात्रेयाची उपासना होऊ लागली असावी व तेच स्वरूप आजही रूढ आहे. या त्रिमुख-षड्भूज दत्तात्रेयामागे एक गाय व आजूबाजूस चार श्वान आहेत. गाय हे पृथ्वीचे तर चार श्वान हे चार वेदांची प्रतीके मानली जातात. औदुंबर वृक्षाखाली दत्तात्रेयाचा वास असतो, या समजुतीमुळे हा वृक्ष पवित्र मानतात. नाथ, महानुभाव व वारकरी संप्रदायांत दत्तात्रेयाविषयी नितांत आदर व श्रद्धाभाव आहे. दत्तात्रेय हा योग व तंत्रमार्गातील आचार्य वा योगीराज मानला जातो.
दत्तजयंती दिनी लोक पहाटे पवित्र क्षेत्री किंवा ओढ्यामध्ये स्नान करतात आणि उपवासाचे व्रत करतात. दत्ताच्या प्रतिमेचे ध्यान करतात. पूजा, दीप, धूप, आरत्या तसेच गुरुचरित्र ग्रंथ वाचन, अवधूत गीता, जीवनमुक्त गीता, दत्तप्रबोध आदी ग्रंथांतील पंक्ती म्हणतात.
दत्तात्रेयाची मंदिरे भारतभर आहेत. महत्त्वाची उपासनेची ठिकाणे कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात व गोवा राज्यांत आहेत. कर्नाटकातील गाणगापूर, गुलबर्गा, कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी पिठापुरम्‌‍, आंध्र प्रदेशात काकीनाडा, औदुंबर, सांगली जिल्ह्यात गिरनार, सौराष्ट्र आणि माणिक प्रभू मंदिर आदी ठिकाणी 7 दिवसांचा श्रीदत्त जयंती उत्सव साजरा करतात. काही मंदिरांत मार्गशीर्ष एकादशी ते पौर्णिमेपर्यंत असा पाच दिवसांचा उत्सव साजरा होतो.
गोव्यात साखळी येथे वाळवंटी नदीतीरावर असलेल्या श्रीदत्तमंदिर, खांडेपार येथे नदीतटावरील श्रीदत्त मंदिरात, तसेच केपे येथील दत्तमंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. हजारो लोक मंदिरांना भेटी देऊन दत्तदर्शन घेतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातील लोक हजारोंच्या संख्येने माणिक प्रभू मंदिरस्थळी दत्तजयंती उत्सावास उपस्थित राहतात. दत्त संप्रदायातील लोक माणिक प्रभूना दत्तात्रेयांचे अवतार मानतात.
दत्तात्रेयाचे भावंड चंद्र हा चंद्रदेव व दुर्वासा हे संन्यासी व दत्तात्रय भूतलावर दैवीशक्ती बनून राहिले. म्हणून तीन दैवीशक्तींचा अंश असलेला दत्तात्रेय हा एकटाच कलियुगात देव म्हणून राहिला. म्हणूनच ‘कलियुगात देव एक दत्त राहिला’ असे म्हटले जाते. ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा’ ही दत्ताची आरती प्रसिद्ध आहे. दत्तउपासक ‘ॐ दिगंबराय विघ्नहे, योगीश्रराय धीमहि तन्नी दत्तह प्रचोदयात्‌‍’ या दत्त गायत्री मंत्राचा जप करतात. त्याचा जप केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते.

तिन्ही दैवीशक्तींनीयुक्त भगवान दत्तात्रेय हे सर्वव्यापी आहेत. त्याची उपासना केल्याने मनुष्याला बुद्धी, ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते. त्याचे मंत्र शत्रूने निर्माण केलेले अडथळे दूर करण्यास मदत करतात. भगवान दत्त आपल्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात, त्यामुळे गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी दत्त गायत्री मंत्राचे पठण करून आणि विशेषतः स्फटिक जपमाळेने दररोज 108 वेळा मंत्राचा जप केल्यास माणसाचे सर्व अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
ब्रह्मा-विष्णू-महेश या तिन्ही देवांच्या शक्तीचा अंश असलेला दत्तात्रेय (म्हणजेच विष्णूचा अवतार) दत्तोपासक, नाथ वारकरी संप्रदाय तसेच भक्त-भाविकांचे आराध्य दैवत बनून राहिले आहे. जीवनातील संकटे दूर होऊन सुख, समाधान, शांती लाभावी म्हणून भाविक श्रीगुरुदेव दत्ताच्या उपासनेला विशेष महत्त्व देतात.