माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच काही तासांतच कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली होती. साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर काल कुस्तीपटू बजरंग पुनियाने ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. बजरंग पुनियाने सोशल मीडियावर पोस्ट करत पुरस्कार परत करण्याची घोषणा केली.
त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र लिहले आहे. हे पत्र त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच लगेचच तो नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर पोहोचला आणि तेथील पदपथावर त्याने आपला ‘पद्मश्री’ पुरस्कार ठेवला.
जानेवारी महिन्यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी बृज भूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. ज्यांच्याविरुद्ध कुस्तीपटू आंदोलन करत होते त्यांचे निकटवर्तीयच महासंघाचे अध्यक्ष झाल्याने खेळाडू नाराज झाले आहेत.