>> ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाईंकडून स्पष्ट; इथेनॉल प्रकल्पाबाबत अनभिज्ञता
दयानंदनगर-धारबांदोडा येथील राज्यातील एकमेव असा संजीवनी साखर कारखाना बंद करताना ऊस उत्पादकांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ऊस उत्पादक संघटनेने गेल्या महिन्यात इथेनॉल प्रकल्पासंबंधी ठोस धोरण स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला मुदत दिली होती; परंतु सरकारने अजून स्पष्ट धोरण स्पष्ट केले नाही. त्यामुळे येत्या 2 जानेवारीपासून कारखान्याच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी ऊस उत्पादकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिला.
राज्यात इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने एका समितीची नियुक्ती केली होती; परंतु सर्व अहवाल तसेच प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनी तयार असताना सरकार मात्र अजूनपर्यंत धोरण स्पष्ट करण्यात पुढाकार घेत नाही, असा आरोप देसाई यांनी केला.
गेल्या काही वर्षांत ऊस उत्पादकांना विविध मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे. राज्यात उसाची लागवड होणे अत्यंत गरजेचे असून अनेक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह ऊस उत्पादनावर चालतो. सरकार इथेनॉल प्रकल्पाबाबत धोरण स्पष्ट करीत नसल्याने ऊस उत्पादकांनी 2 जानेवारीपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजेंद्र देसाई यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.