146 खासदारांच्या निलंबनाविरोधात पणजीत विरोधकांची निदर्शने

0
11

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल पणजीतील आझाद मैदानावर संसदेच्या दोन्ही सभागृहांतून 146 खासदारांना निलंबित केल्याच्या हुकूमशाही भाजप सरकारच्या कृतीचा निषेध केला. यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भारतीय राष्ट्रध्वज आणि संसद सदस्यांच्या निलंबनाचा निषेध करणारे फलक हातात घेत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, शिवसेनेचे जितेश कामत, तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी तनोज अडवलपालकर, काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी आदी निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

राहुल गांधी हे सत्य, एकता, जातीय सलोखा आणि लोकशाहीचे कट्टर अनुयायी आहेत. भारताला एकसंघ आणि बलवान ठेवण्यासाठी बलिदान दिलेल्या महान नेत्यांचा वारसा ते पुढे चालवत आहेत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
भाजप सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमित पाटकर यांनी सांगितले.
सुरक्षेचा भंग करून संसदेत प्रवेश करणाऱ्या दोन आरोपींना पासेस देणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी केली.

‘ते’ खासदार देशातील लोकांचा आवाज

>> राहुल गांधी; निलंबनाविरोधात जंतरमंतरवर आंदोलन

संसद सुरक्षेच्या मुद्द्यावरून संसदेत सरकारला प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना निलंबित करण्यात आले. ते 146 जण केवळ खासदार नाहीत, तर ते भारतातील लोकांचा आवाज आहेत, असे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी काल म्हणाले.
संसदेतील विरोधी खासदारांच्या निलंबनाविरोधात शुक्रवारी इंडियातील घटक पक्षांनी जंतरमंतर येथे आंदोलन केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते आंदोलनात सहभागी झाले होते.

काही दिवसांपूर्वी संसद भवन परिसरात तीन-चार तरुण घुसले होते. त्यापैकी दोघांनी सभागृहात उड्या मारल्या. ते तरुण आत कसे आले? त्यांनी स्मोक कॅन तिथे कसे आणले? त्यांच्या आंदोलनाचे कारण काय? या प्रश्नांचीची उत्तरे मोदी सरकारने संसदेत दिली नाहीत. मात्र बेरोजगारी हे या आंदोलनामागचे प्रमुख कारण होते; कारण या देशातल्या तरुणांच्या हाताला काम नाही, असे राहुल गांधी म्हणाले.