विधानसभा अधिवेशन 2 फेब्रुवारीपासून

0
13

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

2024-25चा अर्थसंकल्प सादर करणार

गोवा विधानसभेचे आगामी अधिवेशन येत्या 2 फेब्रुवारी 2024 पासून घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात वर्ष 2024-2025 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनातील कालावधी अजूनपर्यंत निश्चित झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळाने येत्या 2 फेब्रुवारीपासून अधिवेशन घेण्यास मान्यता दिली आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाणार आहे. राज्यपालांचे अभिभाषण या अधिवेशनाच्या सुरुवातीला होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दीनदयाळ आरोग्य सेवा योजनेच्या (डीडीएसएसवाय) आरोग्य कार्डधारकांना आभा कार्ड नोंदणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आहे. तसेच, राज्य सरकारकडून डीडीएसएसवाय योजनेमध्ये सुधारणा केली जाणार आहे. खर्च मर्यादा, मेडिक्लेम, नवीन उपचारांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे या कार्डाचा राज्याबाहेर वापर करणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
डीडीएसएसवाय कार्डधारकांनी आभा कार्ड नोंदणी केल्यानंतर देशातील कुठल्याही भागात उपचार घेणे शक्य होणार आहे. तसेच, आभा कार्डाच्या माध्यमातून आरोग्य उपचारांची नोंदणी ठेवली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना वैद्यकीय तपासणीसाठी वेगवेगळ्या अहवालांची फाईल घेऊन फिरण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

नोकरभरतीसाठी कोकणी सक्तीची
राज्यातील अ आणि ब वर्गातील नोकरभरतीसाठी कोकणीचे ज्ञान बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि, आरोग्य खात्यातील सल्लागार आणि व्यावसायिक महाविद्यालयामधील प्राध्यापकांच्या जागांसाठी कोकणी ज्ञानाची सवलत देण्यात आली आहे. कारण, व्यावसायिक महाविद्यालयासाठी कोकणीचे ज्ञान असलेले प्राध्यापक मिळत नाहीत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सरल उद्योग साहाय्य योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म, लघू उद्योजकांना घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर सूट दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील शिक्षण, आरोग्य विभागातील काही जागा कंत्राटी पद्धतीवर भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, एका अधिकाऱ्याला मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणी एक सदस्यीय आयोगाने सादर केलेला अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी आला नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. भोम येथील ग्रामस्थ नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाच्या प्रकरणी भेटण्यासाठी येणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

झुवारी पुलाच्या लेनचे
आज उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झुवारी पुलाच्या डाव्या चौपदरी लेनचे उद्घाटन आज शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता करण्यात येणार आहे. यावेळी झुवारी पुलावरील फिरते रेस्टॉरंट आणि पर्वरी येथील महामार्गावरील सहापदरी उड्डाण पुलाच्या बांधकामाची पायाभरणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.