संसद भवनाच्या सुरक्षेसाठी आता सीआयएसएफ

0
18

घुसखोरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

आणखी तीन खासदारांचे निलंबन

संसद भवनाच्या सुरक्षेसाठी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलदेखील (सीआयएसएफ) तैनात करण्यात आले आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. सीआयएसएफकडे सध्या अणू, दिल्ली मेट्रो, विमानतळ आणि एरोस्पेस संबंधित संस्थांसह अनेक इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. सीआयएसएफसोबत संसद सुरक्षा सेवा, दिल्ली पोलीस आणि संसद कर्तव्य गट यांचाही सहभाग असेल.

भियंता ताब्यात
कर्नाटकातील अभियंता श्रीकृष्णा जगाली याला लोकसभेतील सुरक्षा त्रुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवार दि. 20 डिसेंबरच्या रात्री जगालीला याला दिल्ली पोलिसांनी बागलकोट येथून ताब्यात घेतले. त्याला दिल्लीत आणण्यात आले आहे. जगाली हा कर्नाटकच्या निवृत्त एसपीचा मुलगा असून तो डी. मनोरंजनचा मित्र आहे. तसेच या प्रकरणी उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांचीही चौकशी केली जात आहे. मनोरंजनने चौकशीदरम्यान श्रीकृष्ण जगालीचे नाव सांगितले होते.

दरम्यान, सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सागर शर्मा, डी मनोरंजन, अमोल शिंदे आणि नीलम या चार आरोपींची कोठडी आज 21 डिसेंबर रोजी संपत आहे. ललित झा आणि महेश कुमावत हे अन्य दोन आरोपीही कोठडीत आहेत. या सहाजणांची दिल्ली पोलिसांच्या पाच वेगवेगळ्या तुकड्यांकडून चौकशी सुरू आहे.
अनिश दयाल सिंग यांच्यासह निमलष्करी दलाचे जेसीपी दर्जाचे अधिकारी, गुप्तचर संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा विभागाचाही संसदेतील घुसखोरी प्रकरणाच्या तपासात सहभाग आहे.

आणखी 3 खासदार निलंबित

लोकसभेतून आणखी तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार नकुलनाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज यांना सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे आता निलंबित खासदारांची संख्या 146 वर पोहोचली आहे. यामध्ये लोकसभेच्या 100 खासदारांचा समावेश आहे. संसदेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केल्यानंतर 14 डिसेंबरपासून खासदारांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू झाली. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 14 डिसेंबर रोजी विरोधी बाकांवरील 13 खासदार, 18 डिसेंबर रोजी 33 खासदार, 19 डिसेंबरला 49 आणि 20 डिसेंबरला दोन खासदारांना निलंबित करण्यात आले. त्याचवेळी 14 डिसेंबरला राज्यसभेतून 45 आणि 18 डिसेंबरला 45 खासदारांना निलंबित करण्यात आले होते.