नव्या केबल स्टेड झुआरी पुलाच्या डाव्या बाजूच्या चारपदरी मार्गिकेचा रविवार दि. 24 डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती काल सार्वजनिक बांधकाम खात्याने दिली. 24 रोजी सकाळी 10 वाजता ही मार्गिका खुली करण्यात येणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.
झुआरी पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर जुना झुआरी पूल हा पणजी ते मडगाव अशा एकतर्फी वाहनांसाठी असेल आणि तो फक्त हलक्या टू एक्सेल (12 टनापर्यंतच्या वजनाची वाहने) वाहनांसाठीच खुला असेल.
नव्या केबल स्टेड झुआरी पुलाच्या डाव्या बाजूचा चारपदरी मार्ग हा पणजीहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला असेल. (12 टनांपेक्षा जास्ते अवजड वाहनांसह), तर पुलाच्या उजव्या बाजूचा चारपदरी मार्ग हा मडगावहून पणजीला जाणाऱ्या वाहनांसाठी खुला असेल.
जुन्या झुआरी पुलावरून 12 टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना वाहतुकीस बंदी असेल. त्याशिवाय ह्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांची उंची कितीपर्यंत मर्यादित असावी ते निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी आगशीच्या बाजूने ‘हाईट बॅरिअर’ बसवण्यात आला आहे.