अक्षम्य!

0
39

सार्वभौम भारताच्या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये, संसदेमध्ये थेट लोकसभा सभागृहात घुसून काल दोघा तरुणांनी जो धिंगाणा घातला त्याने अवघ्या जगात देशाचे हसे तर झाले आहेच, परंतु संसदेसारख्या देशातील सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणची सुरक्षाही कशी बिनभरवशाची असू शकते त्याचेही थक्क करणारे दर्शन घडले आहे. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या स्मृतीदिनीच हा सारा प्रकार घडावा ही खरोखर चिंतेची आणि शरमेचीही बाब आहे. संसदेच्या चारपदरी सुरक्षा घेऱ्याचा दोन पोरसवदा तरुणांनी काल जो फज्जा उडवला, तो पाहता त्यांच्या जागी दहशतवादी असते तर काय घडले असते ह्या नुसत्या कल्पनेनेही थरकाप उडतो. त्यातही खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवसिंग पन्नूनने एक व्हिडिओ जारी करून येत्या तेरा डिसेंबरला संसदेवर दहशतवादी हल्ला चढवू अशी जाहीर धमकी दिलेली असतानाही संसदेच्या सुरक्षेमध्ये एवढी मोठी त्रुटी राहते हे अनाकलनीय आहे. गुप्तचर विभागाने ह्या संभाव्य हल्ल्याबाबत तारखेनिशी सतर्क केलेले असतानाही हे तरुण स्मोक बॉम्बसह थेट सभागृहात प्रवेश करू शकले ही एवढी मोठी त्रुटी कशी काय राहू शकते? 2001 साली संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता, परंतु तेव्हा आपल्या जाँबाज सुरक्षारक्षकांनी त्यांना संसदेत आत प्रवेश करण्यापासून धाडसाने रोखले होते. त्यात काही जवानांचा बळीही गेला. कालच सकाळी त्यांना संसदेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहिली गेली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच दुपारी हा जो काही प्रकार घडला तो संसदेची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारा आहे. संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघा तरुणांनी थेट लोकसभेच्या सभागृहात उडी घेतली, तीही कामकाज सुरू असताना. लोकसभेच्या बाकांवरून टणाटण माकडउड्या मारीत हे विशी तिशीतले दोघे तरूण सभापतींच्या दिशेने निघाले. सतर्क झालेल्या काही खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांनी स्मोक बॉम्ब बाहेर काढून सर्वत्र पिवळा धूर पसरवला. स्मोक बॉम्बच्या जागी येथे खरे बॉम्ब असते तर? एखादा विषारी वायू असता तर? एखादे हत्यार किंवा अश्रुधूराचे नळकांडे असते तरीदेखील बंद वातावरणात त्याने हाहाकार माजवला असता. संसदेमध्ये प्रवेश करणाऱ्यांना साधी टाचणीही आत नेता येत नाही. वेगवेगळ्या तपास यंत्रणांद्वारे चार चार वेळा त्यांची सुरक्षा तपासणी होत असते. माणसांद्वारेच नव्हे, तर आधुनिक उपकरणांद्वारेही त्यांच्यावर लक्ष ठेवले जात असते. तरीही ही घुसखोरी झाली. लोकसभेत हा प्रकार घडला तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, अनुप्रिया पटेल यांची सभागृहात उपस्थिती होती. संसदेत अनेकदा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचीही उपस्थिती असते. सुदैवाने ते दोघेही यावेळी सभागृहात नव्हते. ‘तानाशाही नही चलेगी’ च्या घोषणा देणाऱ्या ह्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला असता तर? निश्चितपणे सुरक्षेतील ही फार मोठी व गंभीर त्रुटी आहे आणि अक्षम्य आहे. लोकसभेत घुसलेले हे तरुण म्हैसूरचे भाजप खासदार प्रतापसिंह यांच्याकडून रीतसर पास घेऊन आले होते. लोकसभेच्या पासवर्डचा गैरवापर झाला म्हणून खासदार महुआ मोईत्रा यांचे निलंबन झाले. भाजपच्या स्वतःच्या खासदाराकडून आता पासचा एवढा मोठा गैरवापर झाला असता त्यांचे निलंबन का होऊ नये? हाच पास विरोधी पक्षाच्या एखाद्या खासदाराने दिला असता, तर त्यावर केवढा गदारोळ माजवला गेला असता. संसदेच्या सभागृहामध्ये एखाद्या अनधिकृत व्यक्तीने प्रवेश करणे हा संसदेचा अवमान गणला जातो. त्यासाठी शिक्षेची जबर तरतूद कायद्यात आहे. ह्या घुसखोर तरुणांवर राष्ट्रद्रोहाचे कलम लावले गेले तर कलम 124 अ खाली त्यांना जन्मठेपदेखील होऊ शकते. परंतु ह्या तरुणांना शिक्षा देण्यापेक्षा ज्यांच्यामुळे सुरक्षेत ही एवढी गंभीर त्रुटी राहिली त्यांना त्यांच्या बेफिकिरीबद्दल शिक्षा देणे आणि सुरक्षा व्यवस्थेतले दोष दूर करणे हे अधिक जरूरी आहे. एकीकडे संसदेच्या आत हा प्रकार होत असताना संसदेच्या बाहेर एक तरुण आणि एक तरुणी अशाच प्रकारची निदर्शने करताना पकडली गेली. हे सर्वजण एकमेकांना परिचित होते आणि सोशल मीडियावरून त्यांनी ह्या अशा प्रकारच्या निदर्शनांचा बेत आखला असे प्रथमदर्शनी आढळून आलेले आहे. त्यांची ओळखही पटली आहे. ही सगळी उच्चशिक्षित मुले आहेत. त्यांना ह्या निदर्शनांमधून काहीही सांगायचे असो, त्यासाठी त्यांनी जे कृत्य केले ते मुळीच समर्थनीय नाही. त्यांनी केलेला सारा प्रकार हे एखादे दहशतवादी कृत्य नाही हे जरी खरे असले तरी स्वतःची लाज राखण्यासाठी त्याकडे कानाडोळा केला जाऊ नये. देशाची शान असलेल्या संसदेमध्ये सदस्यांच्या बाकांवर त्यापैकी दोघांनी केलेला थयथयाट संसदेची आणि देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारा आहे.