दोन तरुणांची लोकसभेत घुसखोरी

0
15

>> एकूण सहाजणांना अटक

>> संसद भवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

>> आज सर्वपक्षीय बैठक

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच काल बुधवारी दोघांनी अचानक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. भर लोकसभेत हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. यासंबंधी चौघांना व त्यांना आसरा दिल्याबद्दल दोघांना असे सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले.

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून काल नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. शून्य प्रहरात खासदार त्यांचे म्हणणे मांडत असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्या. दोघेही खासदारांच्या बाकावरून लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. याचवेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्मोक कॅनमधून पिवळ्या रंगाचा धूर सोडला. यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतले आहे. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या तरुणाला खासदारांनी पकडले आणि त्याला सुरक्षा यंत्रणांकडे सोपवण्यात आले.
हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे नीलम आणि अमोल यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सर्वपक्षीय बैठक
या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ओम बिर्ला आज दुपारी 4 वाजता केंद्र आणि विरोधी पक्षांशी चर्चा करणार आहेत. सभागृहात घडलेली घटना चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. दिल्ली पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. तर या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

22 वर्षांपूर्वी झाला होता हल्ला
13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी 11.40 वाजता पाच दहशतवादी संसदेमध्ये घुसले होते. गृहमंत्र्यांचा स्टिकर लावलेल्या गाडीमध्ये हे पाचही जण संसदेच्या आवारात आले. पण सुरक्षा रक्षकांना सदर गाडीबाबत संशय आल्यानंतर गाडीला मागे जाण्यास सांगितले गेले. यामुळे दहशतवाद्यांनी गाडीतून बाहेर पडत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. हल्ल्यात एकूण 9 जण ठार झाले होते. त्यात आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या हल्ल्यातील पाचही दहशतवादी सुरक्षा दलांकडून मारले गेले होते. त्यावेळी संसदेत शंभरहून अधिक खासदार, मंत्री उपस्थित होते. 2001 साली संसदेत झालेल्या हल्ल्यानंतर 22 वर्षांनी पुन्हा एकदा संसदेत घुसखोरी करण्यात आलेली आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्यांना कालच लोकसभेतील खासदारांनी श्रद्धांजली अर्पण केली होती.

केंद्रीय गृह खात्याचे चौकशीचे आदेश
संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह खात्याने दिले आहेत. सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी केली जाईल. अन्य सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख देखील या चौकशी समितीत असतील. केंद्रीय गृह खात्याने अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे.

खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली होती धमकी

काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ जारी करून 13 डिसेंबर रोजी भारतीय संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. पन्नूने भारतावर आपल्या हत्येचा अयशस्वी कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर ही धमकी देण्यात आली होती. पन्नूचा धमकीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर होत्या.

मुलाला फाशी द्या ः गौडा

आपला मुलगा देवराज गौडा याने केलेले कृत्य समजल्यानंतर वडील देवराज गौडा यांनी, मनोरंजनने बीईचे शिक्षण पूर्ण केले आहे. एचडी देवेगौडा यांच्यामुळेच मुलाला बीईचे ॲडमिशन मिळाले होते. तो नेहमी दिल्लीला जायचा. आमची कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्या मुलाने असे का केले, हे मला माहीत नाही. असे कृत्य करणारा माझा मुलगा असूच शकत नाही. त्याने चूक केली असेल तर त्याला फाशी द्यावी अशी मागणी केली आहे.