>> 1 एप्रिलपर्यंत आधार लिंक करण्याची सूचना
राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास संचालनालयाने गृहआधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मासिक मानधन केवळ आधार ब्रिज पेमेंट सिस्टमद्वारे करण्याचा निर्णय घेतला असून योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या बॅंक खात्याला आधारकार्ड जोडण्याची सूचना केली आहे. बँक खात्याला येत्या 1 एप्रिलपूर्वी आधारकार्ड न जोडणाऱ्या लाभार्थीचे मासिक मानधन निलंबित ठेवण्यात येणार आहे, असा इशारा खात्याने दिला आहे.
महिला व बालविकास संचालनालयाकडून आधार ब्रिज पेमेंट सिस्टमद्वारे मासिक मानधन वितरणाला 1 एप्रिल किंवा नंतर सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे ज्या गृहआधार योजनेच्या लाभार्थींनी आपल्या बँक खात्याला आधारकार्ड जोडलेले नाही, त्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड जोडून घ्यावे, असे आवाहन करण्यात आली आहे.
महिला व बाल कल्याण खात्याकडून गृह आधार योजनेखाली सुमारे दीड लाख महिलांना मासिक दीड हजार रुपयांच्या मानधनाचे वितरण केले जात आहे. सर्व गृहआधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मासिक वितरण केवळ आधार ब्रिज पेमेंट सिस्टमद्वारे केले जाणार आहे. येत्या 1 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर बँक खात्यावर आधारित हस्तांतरणाद्वारे कोणतेही वितरण केले जाणार नाही, असेही खात्याने स्पष्ट केले. ज्या लाभार्थींनी आधार सक्षम पेमेंट सिस्टमसाठी त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खाते क्रमांकाशी जोडलेला नाही. त्यांनी 1 एप्रिल 2024 पूर्वी त्यांच्या संबंधित बँक शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक होईपर्यंत साहाय्य निलंबित केले जाणार आहे.
दरम्यान, समाजकल्याण खात्याने सामाजिक योजनेच्या लाभार्थींच्या मासिक मानधनासाठी आधार आधारित प्रणालीचा वापर करण्याचे जाहीर केलेले आहे.