- डॉ. सीताकांत घाणेकर
आता आपल्या भारतीय योगशास्त्राला इतके महत्त्व प्राप्त झाले आहे की ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद वाटावी. विश्वाला व त्यातील घटनांना सकारात्मक वळण देण्यासाठी योगशास्त्र सक्षम आहे. पण त्यासाठी त्या शास्त्राच्या तत्त्वज्ञानाचा योग्य अभ्यास व त्याप्रमाणे धारणा अत्यावश्यक आहे.
आपला सर्वांचा भारत देश खूप पुरातन आहे. त्याचा सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे. विश्वातील प्रत्येक क्षेत्राचे आपल्याकडे अतिउत्तम असे ज्ञान आहे- भौतिक, सांस्कृतिक, संगीत-कला-नाटक, विज्ञान, आर्थिक… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे आध्यात्मिक ज्ञान आहे. अनादिकालापासून या देशात अनेक संत-महापुरुष जन्माला आले. मोठमोठे ऋषी-महर्षी व थोर राजे-महाराजे येथे जन्मले. या भूमीत स्वतः विष्णू भगवंतानी विविध योनींमध्ये अवताररूपात जन्म घेतले. स्वतः कृष्णावतार भगवंताने श्रीमद् भगवद्गीता कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धातून विश्वाला दिली. पाच हजार वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ आजदेखील तथाकथित ‘मॉडर्न’ युगात तेवढाच मार्गदर्शक आहे.
अशा या पुण्यभूमीला विविध विशेषणांनी ओळखले जात होते- आध्यात्मिक देश, सोने की चिडिया वगैरे… येथे घराघरांतून सोन्याचा धूर येत होता म्हणजे हे राष्ट्र प्रत्येक क्षेत्रात प्रगत होते. सगळीकडे सुख-समृद्धी होती. पण वेळोवेळी या राष्ट्रावर अनेक परकीयांनी आक्रमणे केली. देशाची दुर्दशा केली. पण भारतीयांनी मात्र कुठल्याही देशावर आक्रमण केलेले नाही. उलट सर्वांना क्षमा केली. शांततेचा आपला मूळ धर्म सांभाळून ठेवला.
वेळेचे, प्रारब्धाचे चक्र फिरतच राहते. त्या-त्या वेळी विश्वातील विविध राष्ट्रे प्रगती करतात, मग अधोगतीला जातात. त्याचप्रमाणे पाश्चात्त्य देशांना समृद्धी प्राप्त झाली. आता हळूहळू चक्र पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. उदा. जपान, चीन, भारत ही राष्ट्रे आज प्रगतिपथावर आहेत. परंतु दुर्भाग्याने घडत असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला भूषणावह नाहीत. उदा.
- लाचलुचपत, भ्रष्टाचार या गोष्टी अगदी टोकाला गेल्या आहेत.
- महिलांवर, लहान बालकांवरसुद्धा भयानक अत्याचार होत आहेत. लैंगिक घटनांना तर सीमाच नाही. अगदी छोट्या बालिकांवरदेखील लैंगिक अत्याचार केले जातात. त्यांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीने घुसवले जाते. त्यांना भिकारी बनवून समाजात भीक मागायला पाठवले जाते. व्यवस्थित जेवणदेखील त्यांना देत नाहीत. अशा अभागी मुलांसाठी मानवतेचे कार्य करणाऱ्या संस्थांचे निष्कर्ष वाचले, व्हिडिओ बघितले तर अंगावर काटा येतो.
- ज्या देशात गायीला पवित्र मानले, त्याच देशात अन्नाच्या शोधात गुरे रस्त्यावर फिरू लागली आहेत. यात बरीच जनावरे बळी पडताहेत. येथेदेखील काही मानवतावादी संस्था छान कार्य करत आहेत. गोशाला बांधून त्यांना आश्रय देतात. पण एकूण संख्या पाहता त्यांची शक्ती अपुरी पडत आहे असे दिसते.
- हल्ली गाजतो आहे तो विषय म्हणजे रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांचा. त्यांनी माणसांना घेतलेल्या चाव्यांचा. त्यांच्यासाठीदेखील काही संस्था आहेत, जिथे अशा कुत्र्यांना सांभाळले जाते.
- मानवाच्या जीवनाकडे लक्ष दिले तरी तिथेदेखील विविध नकारात्मक घटना- भांडणे, कोर्टकचेऱ्या, घटस्फोट, खून वगैरे.
- त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये सतत युद्धाची खुमखुमी वाढत आहे. आतंकवादात हजारोंच्या संख्येने लहानमोठे नागरिक मृत्युमुखी पडत आहेत.
- या सर्व घटनांना आता नैसर्गिक आपत्तीचीही साथ लाभली आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ, कुठे पिकांची नासधूस तर कुठे विविध तऱ्हेचे रोग. कोरोना आटोक्यात आला तर आता आणखी नवे नवे रोग डोके वर काढताहेत.
- वैयक्तिक पातळीवरदेखील बातम्या चांगल्या नाहीत. भारत म्हणे मधुमेह रोगात पहिल्या नंबरवर आहे. स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सगळीकडे वाढतच आहे. यात गोव्याचे आकडे अगदी उच्च स्तरावर आहेत. त्याशिवाय हृदयरोगाबरोबर कर्करोगदेखील सतत वाढताहेत.
ही एक नकारात्मक घटनांची न संपणारी यादी आहे. शास्त्रकारांच्या मते आजच्या युगात- कलियुगात- असे घडणे साहजिकच आहे. पण मुख्य मुद्दा म्हणजे यावर अभ्यास व गंभीरपणे विचार झाला पाहिजे.
तसे पाहिले तर 2014 मध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली. ती म्हणजे, विश्वातील 178 राष्ट्रांनी संमत केलेला जागतिक योग दिन- 21 जून. त्याचबरोबर त्यांचे घोषवाक्य होते- ‘समन्वय व शांतीसाठी योग.’ 2015 साली हेच घोषवाक्य मानून योग दिन साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी निरनिराळी घोषवाक्ये आली- ‘तरुणांसाठी योग’, ‘कुटुंबासाठी योग’, ‘आरोग्यासाठी योग’, ‘मानवतेसाठी योग’… आणि आता या वर्षी- ‘वसुधैव कुटुंबकम्।’
आता आपल्या भारतीय योगशास्त्राला इतके महत्त्व प्राप्त झाले आहे की ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद वाटावी. विश्वाला व त्यातील घटनांना सकारात्मक वळण देण्यासाठी योगशास्त्र सक्षम आहे. पण त्यासाठी त्या शास्त्राच्या तत्त्वज्ञानाचा योग्य अभ्यास व त्याप्रमाणे धारणा अत्यावश्यक आहे.
सध्यातरी तसे दृश्य दिसत नाही. कर्मकांडात्मक हटयोग फार प्रचलित झालेला दिसतो. योगशास्त्राच्या सर्व मार्गांचा व पैलूंचा योग्य अभ्यास व त्याप्रमाणे शास्त्रशुद्ध योगसाधना जरूरीची आहे. योगशास्त्रातील विविध विस्तृत शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यावर भर द्यायला हवा-
- महर्षी पतंजली यांची योगसूत्रे.
- हटयोग प्रदीपिका.
- स्वामी विवेकानंद यांच्या प्रवचनांवर आधारित विविध योगमार्गांचे साहित्य- ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग (अष्टांगयोग).
- श्रीमद् भगवद्गीता स्वतः भगवंतानी गायीलेली. हे तर सर्व योगमार्गाचे संपूर्ण शास्त्र आहे. प्रत्येक अध्यायात भगवंताने विविध पैलूंचे विवेचन केले आहे. विश्वाचे गूढ आपला लाडका भक्त- अर्जुन- याला अत्यंत प्रेमाने सांगितले आहे.
गीतेचा शास्त्रशुद्ध अभ्यास आज विश्वातील अनेक देशांत होतो आहे. असे असले तरी भारतात मात्र अपेक्षित तेवढा अभ्यास, प्रचार, प्रसार होताना दिसत नाही. अवश्य अनेक नावाजलेल्या संस्था आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्यांचे कौतुक जरूर करावे. पण त्यांना संपूर्ण सर्वतोपरी साहाय्याची अत्यंत गरज आहे. आपले योगसाधक नक्की या विषयावर विचार करतील.
विश्वातील नकारात्मक घटनांमुळे अनेकजण हताश होताना दिसतात. पण त्यांना भारतातून आशेचा किरण अवश्य दिसेल. खरे म्हणजे तो दिसतच आहे म्हणून भारताला ‘विश्वगुरू’ ही संज्ञा लाभली आहे. काही योगशास्त्रज्ञांच्या मते या सर्व घटना म्हणजे सतयुगाकडे वाटचाल चालू आहे दे दाखवणाऱ्या आहेत.
त्रेतायुगात रामावतार आले, द्वापारयुगात श्रीकृष्णावतार आले. आता इतिहासकारांच्या मताप्रमाणे व भाकिताप्रमाणे कलिअवतार येऊन विश्वाला तारणार आहे व तद्नंतर सतयुग सुरू होणार आहे.
खरे म्हणजे कलीच्या आगमनाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. प्रत्येक जणाने योगशास्त्राच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला तर त्यांच्या अंतर्मनात सत्युग लगेच सुरू होईल. तसेच सत्युगात सहज प्रवेश घेता येईल. त्यासाठी प्रत्येक मार्गाचा अभ्यास आवश्यक आहे.
- ज्ञानमार्ग ः आत्मविश्लेषणाचा मार्ग- वास्तविकता, सुख-दुख यांचे ज्ञान- येथे बुद्धी प्रमुख.
- भक्तियोग ः आत्मसमर्पणाचा मार्ग- भावनिक संवर्धन आणि मनाच्या स्थिरतेसाठी आवश्यक- येथे निस्वार्थी प्रेम प्रमुख.
- कर्मयोग ः स्वार्थत्यागाचा मार्ग- येथे कर्मकुशलतेमध्ये वृद्धी अपेक्षित आहे- कर्मावर ध्यान प्रमुख.
- राजयोग/अष्टांगयोग ः पतंजलीयोग- आत्मनियंत्रणाचा मार्ग- प्रबळ स्वतंत्र, निर्णयशक्ती लाभते. या योगाची आठ अंगे- यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी- अत्यंत विस्तृत व मानवविकासासाठी प्रबळ आहेत.
हे सर्व तत्त्वज्ञान अभ्यासणे योगसाधकाला आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद हाच मुद्दा मांडतात- ‘तत्त्वज्ञानाशिवाय योगसाधनेला पाया नाही. योगाशिवाय तत्त्वज्ञानाला फळ नाही.’ आपले योगसाधक स्वामीजींचे शिष्य आहेत. ते त्यांच्याच मार्गाचे अनुसरण करतात.