मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने अखेर काल मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवला. शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपने नवा चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला. मोहन यादव हे आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी काम केले आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजप आमदारांनी अनुमोदन दिल्याने मोहन यादव हे मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील, यावर शिक्कामोर्तब झाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या या निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आठ दिवसानंतर मोहन यादव यांच्या नावावर शिक्काबोर्तब करण्यात आले. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2020 ते 2023 यादरम्यान मोहन यादव यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते.
शिवराज सिंह चौहान
यांचे घेतले आशीर्वाद
विधिमंडळ गटनेता ठरवण्याच्या बैठकीत डॉ. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मोहन यादव यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आशीर्वाद घेतले. शिवराज सिंह यांनीही त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून आशीर्वाद दिला. मोहन यादव हे मध्यप्रदेशातील भाजपचा मोठा ओबीसी चेहरा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केल्याची चर्चा आहे. मोहन यादव यांची शैक्षणिक पात्रता पीएचडी आहे.
मध्यप्रदेशात दोन उपमुख्यमंत्री नेमण्याचे भाजपने ठरवले आहे. त्यानुसार राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे उपमुख्यमंत्री असतील.
नरेंद्रसिंह तोमर हे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असतील. त्यांनी केंद्रात कृषीमंत्रिपद भूषवले होते. मध्य प्रदेशात सत्ता आल्यानंतर त्यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होते. मात्र, त्यांना विधानसभा अध्यक्षपदी संधी देण्यात आली.