लक्ष्मण पित्रे ः एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

0
60
  • शरत्चंद्र देशप्रभू

गोव्याचे नामवंत लेखक लक्ष्मण कृष्ण पित्रे आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त ‘नंदनवन’ स्पाइस फार्म, कोडार रोड, ओपा, खांडेपार येथे दि. 5 डिसेंबर 2023 रोजी अमृतवर्षपूर्तिसमारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने-

साल 1966. जून महिना. धेंपो कॉलेज, मिरामार. प्रवेशाचा पहिलाच दिवस. डॉ. यशवंत लवंदे यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व अन्‌‍ मार्गदर्शनपर केलेले पहिलेवहिले संबोधन. या प्रभावातून बाहेर येतो तो एकापाठोपाठ एक विविध विषयांवरील व्यासंगी प्रोफेसरांची लेक्चर्स. सारेच वातावरण स्तिमित करणारे. नंतर हवाहवासा वाटणारा मध्यंतर. याच छोट्या अवधीत झालेल्या ओळखी अन्‌‍ पहिल्याच आवेगात झालेले समविचारी, एकमेकांच्या मनाच्या लयतालाशी नाते जुळणारे समूह. या जंजाळात पित्रेंची ओळख झाली नाही. परंतु ती वेळ आली दुसऱ्याच दिवशी. फेरीबोटीजवळच्या काँग्रेस कार्यालय असलेल्या पोर्तुगीजकालीन इमारतीखाली. कॉलेजला जायला पणजी-मडगाव ट्रान्स्पोर्ट सोसायटीची बसची व्यवस्था केली होती. पासेस फिदाल्गु हॉटेल येण्यापूर्वीच्या विभागीय कार्यालयात विक्रीस ठेवलेले असत. खास धेंपो कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एका फेरीचे पंधरा पैसे. इथेच लक्ष्मण पित्रेंची ओळख झाली. जर्द निळी पँट अन्‌‍ खोचलेला लांब बाह्यांचा शर्ट.

पाठीला नकळत आलेली बाक अन्‌‍ कंबरेचा भाग झुकलेला. चेहऱ्यावर मिस्कील स्मित अन्‌‍ मराठी ढंगाने बोललेली कोंकणी. निर्मळ मनाचे, निरागस स्वभावाचे पडसाद चेहऱ्यावर उमटले होते. त्यावेळीच मला वाटले की आमची तार कुठेतरी जुळेल अन्‌‍ ती जुळली. घनिष्ठ संबंध नसले तरी वेळप्रसंगी संभाषणाला कालमर्यादा नसे. दोघानी मराठी विषय घेतल्यामुळे अन्‌‍ स्व. प्रा. गोपाळराव मयेकर अन्‌‍ नाडकर्णी यांच्याबद्दलचा आदर हा आमच्यातील आणखीन एक समान दुवा ठरला. दोनच वर्षांचा कालावधी, परंतु मैत्र टिकून राहिले. त्याला आम्ही मित्र ‘माधव’ असे संबोधत असू. माधवला विनोद व अभिनयाचे अंग पण होते. संगीतातही रस असावा. परंतु फिल्मी संगीतात इतरांसारखे झोकून देणे त्याच्या स्वभावात नव्हते.

राजकारण, क्रीडाविश्व यांत कधी माधवने माझ्या इतर सोबत्यांसारखा रस दाखवला नाही. त्या विषयातली भूक भागविण्यासाठी शंकर म्हामाय, ज्ञानू बोरकर, अजित मोये, विनायक नाईक होते. परंतु माधवच्या संगतीत एक आश्वासक संरक्षक-कवच लाभायचे. किमान वलय निर्माण व्हायचे. याचे कारण म्हणजे, त्याची निर्विष बोली. त्याच्या बोलण्यात विखार, टीका, मत्सर, असूया यांना थाराच नव्हता. असलेच तर विनोदी चुटकुले. माधवने कॉलेज-जीवनात आपल्याला झालेल्या अपघातावर एक फार सुंदर लेख मॅगझिनसाठी लिहिला होता. आपल्यातील दोषांवर विनोद करण्याचे कसब या लेखातून प्रतीत होत होते. दिवंगत प्रा. नाडकर्णीसरसारख्या चिकित्सक अभ्यासकाने पण या लेखाची प्रशंसा केली होती. त्यातील ट्रकला उद्देशून वापरलेला शब्द ‘ट्रकासुर’ म्हणजे कमालच! ‘माझे फसलेले स्वर्गारोहण’ असे या लेखाचे नाव असावे. एकदा तर माधवने कमाल केली. गाजलेली देवानंदची ‘ज्युवेल थीफ’ टोपी परिधान करून कॉलेजात अवतरला अन्‌‍ विनोदी शैलीत आपापल्या मौलिक वस्तू सुरक्षित ठेवण्याची सुचवणी करू लागला. निरागस बाल्याचे वरदान त्याला लाभले होते.

दोन वर्षांचा आपला अभ्यासक्रम आटोपून माधव पुढील शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाला. माधव पुरातत्त्व खात्यात सेवेत दाखल झाल्यावर पुनश्च आमच्या भेटीगाठी कामानिमित्त घडू लागल्या. वस्तुसंग्रहालय पाटो प्लाझा परिसरात आल्यावर तर ओझरत्या भेटी व्हायच्या; परंतु कामाच्या अतिरिक्त व्यापामुळे माधवच्या वस्तुसंग्रहालयाला भेट देण्याच्या आग्रहाला मान देऊ शकलो नाही. कुठल्यातरी सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त तेथे जाणे झाले. परंतु तोपर्यंत माधव सेवेतून निवृत्त झाला. परंतु त्यानंतरच आमच्या भेटीगाठीची व्याप्ती वाढली. निमित्त आमचे लेखन अन्‌‍ ग्रंथनिर्मिती. माझ्या पहिल्यावहिल्या पुस्तकाची लेखनशुद्धी या माझ्या मित्राकडून होणे म्हणजे एक पूर्वसंचितच. माधवने पण आपली प्रसिद्ध झालेली पुस्तके भेट दिली. माझ्या पुस्तकांच्या प्रकाशनाला अगत्यपूर्वक हजर राहिला. माधवच्या पुस्तकांचे परिशीलन करणे माझ्या अधिकार-कक्षेत येत नाही. तेवढा माझा व्यासंग पण नाही. परंतु त्याचा ‘सूर जुने पण नूर नवा’ हा विडंबनसंग्रह फारच भावला. आचार्य अत्रेंच्या ‘झेंडूच्या फुलां’नी लावलेली अवीट गोडी माधवच्या या विडंबनसंग्रहाने वृद्धिंगत केली. संग्रह गाजलाच; उत्कृष्ट सादरीकरणामुळे माधवच्या अंगात लय-ताल भिनल्याचे सिद्ध झाले. माधवने विविध विषयांवर व्याख्याने दिली, विपुल ग्रंथनिर्मिती केली, प्रसिद्धी मिळवली, परंतु मनाला कधी अहंकाराचा स्पर्श करू दिला नाही. किंबहुना तो होणेच शक्य नव्हते. माधवची या वयात जोरदार फलंदाजी चालू आहे. प्रकृतीची, कुटुंबाची साथ आहे. त्याची आणखी दोन पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. अशा प्रसंगी देवापाशी एकच मागणे- जीवेत्‌‍ शरदः शतम्‌‍।