फेरीधक्क्यावरून कार पाण्यात, चालकाचा मृत्यू

0
17

>> सारमानस-पिळगाव येथील घटना

>> महिला व मुलगा सुखरूप बचावले

सारमानस – पिळगाव येथील फेरीधक्क्यावर एक व्हेगनआर कार थेट पाण्यात गेल्याने कारचालक युवकाचा मृत्यू झाला. या घटनेत कारमध्ये असलेल्या एका पर्यटक महिलेने आपल्या मुलासह कारमधून उडी मारल्याने त्यांचे प्राण सुदैवाने वाचले. या घटनेत मृत्यू झालेल्या कारचालक यतीन महादेव मयेकर (29, रा. धबधबा डिचोली) याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उत्तरीय तपासणीनंतर खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. सदर दुर्दैवी घटना काल मंगळवार दि. 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वा. च्या सुमारास घडली.
उपलब्ध माहितीनुसार यतीन मयेकर हा युवक व्हेगनआर कारने (जीए 06 डी 9472) एक भाडे घेऊन करमळी रेल्वेस्थानकावर निघाला होता. या कारमध्ये मुंबई येथील अमित विजय कोरगावकर, यशश्री कोरगावकर, मुलगा अईन कोरगावकर (12) हे तिघेजण होते.

चालक सीटवर कोसळला
सारमानस येथे फेरीधक्क्यावर सदर कार दाखल झाली. त्यावेळी तिथे चारचाकी वाहनांची गर्दी होती. करमळी रेल्वे स्थानकावर लवकर पोहोचणे गरजेचे होते. अन्यथा रेल्वे चुकेल म्हणून कारमधील अमित कोरगावकर हे खाली उतरून पुढे रांगेत उभ्या असलेल्या कारचालकांना त्यांची गाडी पुढे सोडण्याची विनंती करू लागले. त्याचवेळी कारचालक यतीन हा सीटवरच कोसळला व गाडी पाण्याच्या दिशेने जाऊ लागली. त्यावेळी गाडीत असलेली महिला यशश्री यांनी मुलासह प्रसंगावधान राखून कारचा दरवाजा उघडला व बाहेर उडी मारली. त्यांना स्थानिकांनीही सहकार्य केले. तोवर कार पाण्यात गेली.

ही घटना घडताच फेरीधक्क्यावर एकच गोंधळ उडाला. फेरीधक्क्यावर उपस्थित असलेल्या निखिल वरगावकर (सारमानस), पांडुरंग कुंडईकर, लक्ष्मीकांत भाक्षईकर, नारायण कवळेकर (सर्व पिळगाव) या स्थानिकांनी थेट पाण्यात उडी मारली व पाण्याखाली असलेल्या कारमधील चालक यतीन मयेकर याला बाहेर काढले. परंतु तोवर यतीन याची प्राणज्योत मालवली होती. कारमध्ये असलेली सदर महिला ही परिचारिका असून तिने यतिनची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे आढळले.

या घटनेमुळे सारमानस ते सांतईस्तेव ही फेरीसेवा पूर्णपणे ठप्प झाली. फेरीधक्क्याखालीच कार असल्याने फेरी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या जलमार्गावरील लोकांचेही हाल झाले. रात्री 8 वा. च्या सुमारास पाण्यात गेलेली व्हेगनआर कार पाण्याबाहेर काढण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनीच गाडी बाहेर काढली.
डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी नाईक व जवानांनी मदतकार्य करून वाहन बाहेर काढले. डिचोली पोलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.