म्हापसा न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता म्हापसा न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ येणाऱ्या व्यक्तींकडून पैसे घ्या व मते मात्र आमच्याच पक्षाच्या उमेदवाराला द्या असे जाहीर वक्तव्य त्यावेळी केजरीवाल यांनी केले होते. त्यास अनुसरून न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. म्हापसा टॅक्सी स्थानकावर दि. 8 जानेवारी 2017 रोजी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केजरीवाल यांनी वरील विधान केले होते. त्याची गंभीर दखल भाजपने घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. आयोगाने म्हापसा पोलिसात याची तक्रार नोंदवली आणि प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. त्यानुसार या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे.