दक्षिण गोव्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. तसेच मला लोकसभा निवडणूक लढविण्यात रस नाही, असे कुडचडेचे आमदार तथा माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काल स्पष्ट केले.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार नीलेश काब्राल हे आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता काही जणांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार काब्राल म्हणाले की, आपण अजूनही तरुण आहे. त्यामुळे आपणाला कुठल्याही प्रकारची घाई करून निर्णय घेण्याची गरज नाही. मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करून भविष्यातील निर्णय घेतला जाईल. सध्या कुडचडे मतदारसंघ हे माझे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी एकाला मंत्रिपद देण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. तसेच, पक्षानेही मला राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे; अन्यथा आपण राजीनामा दिला नसता, असेही काब्राल यांनी स्पष्ट केले.