- विलास सतरकर
कुटुंबात मुले बऱ्याच गोष्टी शिकत असतात. मुलांवरती चांगले संस्कार होण्यामध्ये कुटुंबाचा फार मोठा वाटा असतो. संयुक्त कुटुंब असो वा विभक्त कुटुंब असो- कुटुंबात जर शिस्त नसेल तर त्याची आगामी काळात फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आपल्या देशात आपण आई-वडील, मुले एकत्र राहतो, एकमेकांचा आदर करतो, एकमेकांशी सल्लामसलत करतो म्हणून आजवर टिकलो आहोत. नाहीतर पाश्चिमात्त्य देशांसारखी आमची परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही!
‘कुटुंब’ हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा वारसा आहे, तसेच तो आपल्या भविष्याचा आधारस्तंभ आहे. भारतीय कुटुंब हे प्रभावी संस्कारकेंद्र होते व आहे. व्यक्तीच्या जीवनविकासात कुटुंबाचा फार मोठा वाटा असतो. आपल्या संस्कृतीमध्ये माता ही प्रथम गुरू मानली जाते. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव’- या श्लोकात म्हटल्याप्रमाणे माता, पिता आणि गुरुजनांना आपल्या संस्कृतीमध्ये देवाचे स्थान दिलेले आहे.
एकत्र कुटुंबात आजी-आजोबांकडून मुले बऱ्याच गोष्टीचे शिक्षण घेत असतात; आणि आता बरीच मुले या अशा गोष्टीपासून व अशा अनौपचारिक शिक्षणापासून वंचित झालेली आहेत. एकूण संयुक्त कुटुंबात मुलाचं ‘मी’पण गायब होतं व तो आपोआपच ‘आपण’ किंवा ‘आम्ही’ हा संस्कार शिकतो. आयुष्यात पुढे जुळवून घेण्यासाठी लागणारे गुण ते आपोआपच शिकतात. एका कवितेत कवीने म्हटल्याप्रमाणे- ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती.’ कुटुंबात एकत्र राहताना प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणा असणे फार आवश्यक आहे, आणि हीच आपुलकी व जिव्हाळा भारतीय संस्कृतीत फार चांगल्या पद्धतीने रुजलेला आहे. घराचं ‘घरपण’ हे कुटुंबातील लोकांच्या समाधानावर अवलंबून असतं. आपले संस्कार असे असावेत की कितीही वाईट प्रसंग का असेना, सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन त्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. त्याला घराचं ‘घरपण’ व ‘कुटुंब’ असं म्हणतात आणि या अशा संस्कारांचे शिक्षण मुलं कुटुंबातच अनौपचारिकपणे घेत असतात.
आज आपण हळूहळू संयुक्त कुटुंब पद्धतीपासून दूर जात आहोत. दैनंदिन कामाच्या रगाड्यात असो किंवा दोन्ही नवरा-बायको कामाला जात असल्याने असो किंवा इतर कारणे असोत, आपण विभक्त कुटुंबाकडे जात आहोत आणि त्यामुळे मुलांमध्ये प्रश्न वाढत आहेत व नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत. कुटुंबात मुले बऱ्याच गोष्टी शिकत असतात. मुलावरती चांगले संस्कार होण्यामध्ये कुटुंबाचा फार मोठा वाटा असतो. कुटुंबात काही बंधने पाळणे आवश्यक असते. संयुक्त कुटुंब असो वा विभक्त कुटुंब असो- कुटुंबात जर शिस्त नसेल तर त्याची आगामी काळात फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आपल्या देशात आपण आई-वडील, मुले एकत्र राहतो, एकमेकांचा आदर करतो, एकमेकांशी सल्लामसलत करतो म्हणून आजवर टिकलो आहोत. नाहीतर पाश्चिमात्त्य देशांसारखी आमची परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही.
काही गोष्टींचे नियम कुटुंबानेच आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यादृष्टीने आपल्या घरात नियमित पाळणे आवश्यक आहे. वडीलधाऱ्यांना सन्मान द्यावा, त्यांचा आदर राखावा, त्यांना उलट उत्तरे देऊ नयेत अशा प्रकारे संस्कार मुलांवर लहान असतानाच करणे फार आवश्यक आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मुलांवर संस्कार कुठे कमी पडतात का, असा प्रश्न उपस्थित होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजकालची कुटुंबपद्धती. आजकाल आपण पाहतो की कुटुंबामध्ये एकच मूल असल्यामुळे मुलावर पूर्णपणे केंद्रित राहून पालक त्या मुलानुसार आपल्या जीवनामध्ये बदल घडवत असतात. एकंदरीत हा विचार केल्यास संस्कार कुठेतरी राहून जातात व त्या मुलामध्ये नकळतपणे हट्टीपणा, एखाद्या वस्तूबद्दल आग्रह, स्वार्थ अशा अनेक गोष्टी त्याच्या स्वभावामध्ये येतात. म्हणूनच मुलांमध्ये घडलेला बदल हा पूर्णपणे घरातल्या वातावरणावर अवलंबून असतो.
मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी घर-शाळा यांची भागीदारी असणे आवश्यक आहे. आपल्या देशात लागू झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 मध्ये शाळा, कुटुंब आणि समुदाय यांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर दिला गेला आहे. मुलाच्या शिक्षणात कुटुंबाबरोबर समुदायाचा पण सहभाग असतो, आणि तो सहभाग सकारात्मक होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हटले आहे.
विविध शैक्षणिक संशोधनानुसार ज्या ठिकाणी शाळा आणि घर यांची भागीदारी असते त्या ठिकाणी मुलांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे आढळून आले आहे. अशा भागीदारीमुळे मुलांच्या श्रेणीमध्ये प्रगती आढळली आहे. तसेच मुलांच्या शालेय उपस्थितीतही वाढ झाल्याने आढळून आले आहे. घर-शाळा भागीदारीमुळे मुलांच्या वर्तनामध्ये बदल होतो आणि मुले शिस्तीत वागतात, शिक्षकांचा आदर करतात. कुटुंब आणि शाळा भागीदारीतून मुलांमध्ये जीवनमूल्यांचे संस्कार घडून येतात असेही आढळून आले आहे.
मुलांमध्ये विविध शैक्षणिक कौशल्यांची वाढ होण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करू शकतो. मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संस्कार वाढवणे, घरातील छोटी-मोठी कामे करणे, आई-वडिलांना घरकामात मदत करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे अशा विविध गोष्टी मुले शिकू शकतात.
आजच्या काळात बऱ्याच कुटुंबांत मोबाईल, इंटरनेट व विविध सोशल मीडियामुळे घरातील सर्व मंडळी आपापल्या मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेली आढळते. घरातील सर्वांनी आपल्यावर सोशल मीडियाचा किती व कसा वापर करावा यावर काही बंधने घालून घेणे आवश्यक आहे.
मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करणे व त्यांच्यामध्ये वाचन-संस्कृतीचे बीज रुजवणे हे आजच्या काळात खूप आवश्यक आहे. यासाठी घरातील सर्वांसाठी वाचनाची एक नक्की वेळ ठरवली तर त्याचा फार चांगला परिणाम वाचन-संस्कृतीवर होऊ शकेल. जुन्या पिढीमध्ये कुटुंबाचा सहभाग मुलांच्या अनौपचारिक शिक्षणात असायचा. आजच्या पिढीत पालक सुशिक्षित असल्यामुळे मुलांच्या अनौपचारिक व शाळेच्या भागीदारीने औपचारिक शिक्षणात कुटुंबाने सहभागी होणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टाप्रमाणे तर्कशुद्ध विचार आणि कृती करण्यास सक्षम असलेला, करुणा आणि सहानुभूती दाखवणारा, धैर्य आणि लवचिकता असलेला, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशील व उत्तम नैतिक मूल्ये जोपासणारा नागरिक घडवण्यासाठी कुटुंब आणि शाळा यांनी भागीदारीने काम करणे आवश्यक आहे.