भारतीय सुरक्षा दलांची कुलगाममध्ये कारवाई
दहशतवाद्यांसोबत 19 तास चालली चकमक
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा काल सकाळी खात्मा केला. याबाबत काश्मीर विभागीय पोलिसांनी माहिती दिली. गुरुवारी दुपारी सुरक्षा दलांना कुलगामच्या सामनू भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली, ती शुक्रवारपर्यंत सुरुच होती.
काश्मीर विभागीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगामच्या सामनू भागात गुरुवारी दुपारपासून भारतीय सुरक्षा दलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू होती. या कारवाईदरम्यान या संपूर्ण भागात भारतीय सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. त्याला भारतीय सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गुरुवारी रात्री उशिरा अंधारामुळे कारवाई थांबवण्यात आली; मात्र काल सकाळी दहशतवाद्यांकडून पुन्हा गोळीबार सुरू झाला. काल सकाळी झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी मारले गेले. क्रॉस फायरिंगदरम्यान 5 दहशतवादी ज्या घरात लपले होते, त्या घराला आग लागली.
भारतीय लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स, 9 पॅरा (एलिट स्पेशल फोर्स युनिट), सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांचा या कारवाईत सहभाग होता. ही चकमक सुमारे 19 तास चालली.
दरम्यान, 15 नोव्हेंबरला नियंत्रण रेषेवर उरी भागातही चकमक झाली होती. यानंतर ‘ऑपरेशन काली’ राबवत भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील अल्शिपोरा, शोपियान येथे लष्कराच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. मोरीफत मकबूल आणि जाजीम फारुक उर्फ अबरार अशी त्यांची नावे होती. दोघेही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित
होते.
त्याआधी 13 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत 3 अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले होते. शहीद झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि पोलीस डीएसपी यांचा समावेश होता. शोधमोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. त्यात या जवानांना वीरमरण आले होते.