सरकारच्या अभ्यास समिती नियुक्तीच्या निर्णयाचे तीन मंत्र्यांकडून स्वागत
तिसरा जिल्हा स्थापनेच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समिती नियुक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे फोंडा तालुक्यातील मंत्री रवी नाईक, सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर यांनी स्वागत केले आहे. फोंडा हे मध्यवर्ती ठिकाण करून तिसरा जिल्हा स्थापन केल्यास फोंडा, धारबांदोडा, सत्तरी या भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
गेल्या कित्येक वर्षांपासून फोंडा हा केंद्रबिंदू ठेवून तिसरा जिल्हा स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. आता, राज्य सरकारने तिसरा जिल्हा स्थापन करण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची निवड केली आहे. या समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
फोंड्याचे आमदार तथा कृषी मंत्री रवी नाईक यांनी तिसरा जिल्हा स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धारबांदोडा येथे एका कार्यक्रमात बोलताना तिसरा जिल्हा स्थापनेबाबत वक्तव्य केले होते. फोंडा भागातील मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री गोविंद गावडे यांचाही पाठिंबा तिसऱ्या जिल्हा स्थापनेसाठी मिळत आहे.
गैरसोय दूर होणार : नाईक
फोंडा हे केंद्रबिंदू ठेवून धारबांदोडा, सत्तरी तालुक्याच्या भागाचा समावेश केल्यास त्या भागातील नागरिकांची सरकारी कामांबाबतची गैरसोय दूर होऊ शकते, असे रवी नाईक यांनी सांगितले.
सर्वांच्या पाठिंब्याची
गरज : ढवळीकर
तिसरा जिल्हा स्थापनेसाठी फोंडा परिसरातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देण्याची गरज आहे. तिसऱ्या जिल्हा स्थापन झाल्यास नागरिकांना पणजी, मडगाव येथे जावे लागणार नाही, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
तिसरा जिल्हा
लाभदायक : शिरोडकर
फोंडा हा केंद्रबिंदू निश्चित करून तिसरा जिल्हा स्थापन केल्यास नागरिकांना लाभदायक ठरणार आहे, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
ही काँग्रेसची दूरदृष्टी : आलेमाव
तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती हा काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा भाग आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोव्यासाठी काँग्रेसचे एक दूरदृष्टीचे धोरण लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत, याचा आपणाला आनंद आहे. तिसरा जिल्हा फोंडा, धारबांदोडा, सत्तरी आणि सांगे तालुक्यातील नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या जिल्ह्याचे स्वप्न लवकरच साकार : नाईक
फोंडा भागातील नागरिकांना जिल्हा पातळीवरील कामांसाठी पणजी किंवा मडगाव येथे जावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तिसरा जिल्हा स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. आता, सरकारने तिसरा जिल्हा स्थापनेच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे आगामी काळात तिसरा जिल्हा स्थापनेचे स्वप्न लवकर साकार होऊ शकते, असा विश्वास रवी नाईक यांनी व्यक्त केला.