मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मध्यप्रदेशात 230 जागांसाठी 72.30 टक्के मतदान झाले, तर छत्तीसगढमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 70 जागांसाठी 68.15 टक्के मतदान झाले.
मध्य प्रदेशातील सर्व 230 विधानसभा जागांवर निवडणूक लढवणाऱ्या 2533 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता संपले. बालाघाट जिल्ह्यातील बैहार, लांजी आणि परसवाडा या तीन नक्षलग्रस्त जागांवर दुपारी 3 वाजता मतदान संपले. मंडला जिल्ह्यातील 55 नक्षलग्रस्त मतदान केंद्र आणि दिंडोरी येथील 40 मतदान केंद्रांवरही दुपारी 3 वाजता मतदान थांबले.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 70 जागांवर मतदान संपले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 68.15 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान संपल्यानंतर नक्षलग्रस्त गरीबीबंदच्या बिंद्रनवगढमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. यामध्ये आयटीबीपीचे जवान जोगिंदर सिंग शहीद झाले. दरम्यान, छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी 71 टक्के मतदान झाले होते.