गोवा पोलिसांकडून ई-एफआयआर व्यवस्थेवर काम सुरू
गोवा पोलिसांकडून ई-पोलीस स्थानक सुरू केले जाणार असून, ई पोलीस स्थानकासाठी ई-एफआयआर नोंदवण्याची व्यवस्था विकसित केली जात आहे. ई-एफआयआर नोंद व्यवस्थेची सुरुवात झाल्यानंतर नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्थानकात जाण्याची गरज नाही. ई-एफआयआर माध्यमातून आपल्या घरातून तक्रार नोंदविणे शक्य होणार आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी काल दिली.
राज्य सरकारची सर्वच खाती डिजिटलायझेशनकडे वळत आहेत. पोलीस खात्याचे डिजिटलायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. ई-एफआयआरच्या माध्यमातून घरातून तक्रार नोंदविणे शक्य होणार आहे.
पोलीस खात्याने ई-पोलीस स्थानक म्हणून रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस स्थानकाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. ई-एफआयआर व्यवस्था हाताळण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. ई-एफआयआरवर नोंद केलेली तक्रार ई-पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्याला प्राप्त होणार आहे. त्या अधिकाऱ्याकडून तक्रारीबाबत आवश्यक कृती केली जाणार आहे. एफआयआरची प्रत तक्रारदाराला डाऊनलोड करता येईल. पोलीस खात्याकडून ई-पोलीस स्थानकाबाबत जनजागृती केली जात आहे, अशी माहिती वाल्सन यांनी दिली.