वादळी आणि वादग्रस्त

0
48

सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या निधनाने एक वादळी आणि वादग्रस्त पर्व संपले आहे. राष्ट्राभिमानाच्या भावनेवर भर देत आणि स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त म्हणून जनतेपुढे प्रस्तुत करीत लाखो कोटींचे साम्राज्य उभारणारे आणि फायनान्स, रिअल इस्टेट, मीडिया, हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर अशा नानाविध क्षेत्रांमध्ये आपल्या ह्या व्यावसायिक साम्राज्याचा विस्तार करणारे ‘सहाराश्री’ यश आणि कीर्तीच्या शिखरावर जसे आरूढ झाले, तसेच दिवाळखोरी आणि बदनामीच्या खोल खाईतही ढकलले गेले. दीर्घ काळ तिहारची हवा खाण्यापर्यंत आणि नेटफ्लिक्सच्या ‘बॅड बॉय बिलियनेर’ मालिकेत जागा मिळेपर्यंतची पाळी त्यांच्यावर आली. आयुष्यात एवढे टोकाचे चढउतार पाहावे लागलेल्या रॉय यांची गणना नेमकी कुठे करावी हा प्रश्न पडावा एवढा विरोधाभास त्यांच्या जीवनप्रवासामध्ये दिसतो. एकेकाळी जोरात असलेल्या ‘पिअरलेस’पासून प्रेरणा घेऊन बिहारमधील अरारियाच्या एका तरुणाने सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘सहारा फायनान्स’ नावाचा चीटफंड उभारला. बँकिंग दाराशी न पोहोचलेल्या ग्रामीण जनतेसाठी हा मोठा दिलासा होता. त्यामुळे बघता बघता त्यातील ठेवींची संख्या वाढत गेली. व्याप वाढत गेला. लाखोंची, कोटींची उलाढाल करता करता काही लाख कोटींवर कंपनीचा व्याप पोहोचला. बारा लाख कर्मचारी, नऊ कोटी गुंतवणूकदार असा पसारा वाढला. आपल्या व्यावसायिक समूहाची सकारात्मक प्रतिमा उभी करण्यासाठी रॉय यांनी त्याला देशभक्तीची जोड दिली. कंपनीच्या बोधचिन्हावर तिरंगा घेतलेली भारतमाता दिमाखात मिरवू लागली. वर्तमानपत्रांतून मोठमोठ्या जाहिराती येऊ लागल्या, भारतीय क्रिकेट संघाच्या गणवेशावर सहारा हे नाव झळकू लागले. राज्याराज्यांत कार्यालये उभी राहिली, लाखो दलालांचे मोठे जाळे निर्माण झाले. भव्यदिव्य सोहळे, त्यांना बड्या बड्या राजकारण्यांची, सेलिब्रिटींची उपस्थिती नेहमीची झाली. राष्ट्रीय सहारासारखी स्वतःची वृत्तपत्रे, सहारा टीव्हीसारख्या स्वतःच्या टीव्ही वाहिन्या, स्वतःची एअरलाइन्स असा व्याप वाढतच गेला. कंपनीकडे येणारा पैसा मग रिअल इस्टेटपासून हॉस्पिटॅलिटीपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये गुंतवला गेला. महत्त्वाकांक्षी अँबी व्हॅली प्रकल्प घोषित झाला. जनतेचे डोळे विस्फारणाऱ्या एकेक बातम्या येत राहिल्या. लंडनचे ग्रोसवेनॉर हॉटल सहाराने विकत घेतले, न्यूयॉर्कचे प्लाझा हॉटेल सहाराचे झाले. मुंबई विमानतळाजवळ सहारा स्टार उभे झाले, फॉर्म्युला वनचे सहप्रायोजकत्व सहाराला मिळाले, भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्व सहाराने घेतले, कारगील युद्धातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मोठा निधी दिला.. ‘सहारा इंडिया परिवार’ हे नाव सर्वत्र झळकत राहिले, गाजत राहिले. मध्यंतरी त्यांच्या सुशांतो आणि सीमत ह्या दोन मुलांचे लग्न झाले. अडीचशे कोटींचे हे लग्न प्रत्येक उपस्थितासाठी संस्मरणीय ठरले. खास विमानाने सहारा सिटीत नेण्याआणण्याची व्यवस्था काय, बिग बी अमिताभपासून अडवाणींपर्यंतच्या हूज हू मंडळींची उपस्थिती काय, पाहुण्यांच्या सरबराईसाठी ताजच्या हेड शेफचा मेन्यू काय, खास मागवलेला लंडनचा सिंफनी ऑर्केस्ट्रा काय, डोळे दिपवून टाकणाऱ्या त्या सोहळ्याला बॉलिवूड सिताऱ्यांनी चार चाँद लावले. राजकुमार संतोषीने त्या लग्नसोहळ्याचाच चित्रपट बनवला!
शिखरावर चढणे सोपे असते, पण तेथे टिकणे कठीण असते म्हणतात. सहाराचे तेच झाले. जनतेकडून घेतलेल्या दीर्घ मुदतीच्या ठेवींची परतफेड करायची वेळ आली तेव्हा मात्र गणित बिघडले. परतावा न मिळाल्याने ठेवीदारांच्या तक्रारी यायला सुरुवात झाली. नॉन बँकिंग फायनान्स क्षेत्राचे नियमन करणारी सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे ‘सेबी’ सक्रिय झाली. सेबीने सहारा समूहातील दोन कंपन्यांना वैकल्पिक पूर्ण रुपांतरणीय रोख्यांद्वारे पैसा गोळा करण्यास मनाई केली. कोणत्याही परवानगीविना हे पैसे गोळा केले गेल्याचा दावा सेबीने केला. ठेवीदारांचे पैसे वेळीच परत केले जात असल्याचा दावा सहाराने करताच सेबीने पुरावे मागितले. रॉय यांनी काय करावे? सेबीची कार्यालये भरून जातील एवढी शंभर ट्रक कागदपत्रेच पाठवून दिली! मग सुरुवात झाली एका प्रदीर्घ न्यायालयीन लढाईला. न्यायालयाने पंधरा टक्के व्याजाने ठेवीदारांना पैसे परत करण्यास सहाराला फर्मावले. सेबीने जप्तीची कारवाई सुरू केली. अखेरीस मार्च 2014 मध्ये सुब्रतो रॉय यांची रवानगी तिहार तुरुंगात झाली. राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या गळ्यातले ताईत असलेले ‘सहाराश्री’ बघता बघता ‘बिग बॅड बिलेनियर’ ठरले! आता सुब्रतो रॉयच्या निधनानंतर सेबीकडे असलेल्या ‘सहारा’च्या पंचवीस हजार कोटींतून आपले कष्टाचे पैसे परत कधी मिळतील ह्याच्या प्रतीक्षेत देशभरातील हजारो ठेवीदार आहेत!