- डॉ. सोमनाथ कोमरपंत
भारतीय संस्कृती शतकानुशतके दीपोत्सवाच्या रूपाने या प्रकाशपूजनाचा संदेश देत आलेली आहे. संस्कृतीचा गाभा आपण समजून घेतला पाहिजे. नुसती बाह्यतः दीपांची आरास म्हणजे दीपावली नव्हे. अंतरीचे दीप उजळणे म्हणजे दिवाळी. अंतरंगातील मानवतेच्या ज्योती जागविणे म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणे.
विश्वचक्रात ज्योतितत्त्वाचे महत्त्व काय आहे हे वेगळे सांगायला नको. जिथे ज्योत आहे तिथे हात आपोआप जुळले जातात. त्या अंजुळीने मनातला उदात्त भाव प्रकट होत असतो. रात्रीच्या अंधारात सुवासिनी तुलसीवृंदावनासमोर निरांजनात ज्योत तेवत ठेवते. घरातून तुलसीवृंदावनाकडे येईपर्यंत वात वाऱ्याने विझू नये म्हणून ती पदराआड ठेवून जपत असते. दिवा अंधारात प्रकाश देत असतो. दिवा हे संस्कृतीचे प्रतीक. आसमंत प्रकाशमान करणे हे दिव्याचे कार्य. माणसाच्या मनातील काजळीकोपरे नाहीसे करून अंतरंग प्रकाशमान करणे हे संस्कृतीचे कार्य. दिवा आणि संस्कृती यांचे समीकरण असे जुळले जाते. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे ही मानवाची आदिप्रेरणा. एवढेच नव्हे तर अन्य प्राणिमात्रदेखील जगण्यासाठी, भक्ष्यशोधनासाठी प्रकाशवाटा अक्षरशः धुंडाळत असतात. पहाट होताच आनंदस्वरांचे गान करणारे पक्षिगण काय दर्शवितात? अंतरीचे आनंदकल्लोळ प्रकट करणारे हे अंतःसूर असतात. आम्हा माणसांनाही हे पक्षिस्वर उल्हसित करतात. ते आपल्या सुस्वराने आम्हाला साखरझोपेतून उठवितात. दिवसाच्या प्रकाशात रूप-रस-गंध-स्पर्शमय सृष्टीचा आनंद घेण्याची माणसाला अंतःप्रेरणा होत असते. आणि सृष्टी? तीदेखील प्रकाशमानतेची घटिका कधी येणार असे म्हणत प्रतीक्षा करत असते. तसा काळोख म्हणजे अनिष्ट नाही. तीदेखील प्रकाशाची मिटलेली अवस्था असते. पण जीजिविषेसाठी मिटून उपयोगाचे नाही. उन्नयनासाठी निद्रावस्था उपयोगाची नाही. त्यासाठी उठायला हवे. औषनिषदिक मंत्र हाच आहे ः
उत्तिष्ठत् जाग्रत प्राप्य वरान्निऽबोधत्।
- उठा, जागे व्हा. जे प्राप्तव्य आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करा.
समाजातील द्रष्ट्या पुरुषांना भावी काळातील पाऊलखुणांचा अगोदरच शोध लागतो. म्हणूनच तर स्वामी विवेकानंदांनी भारतीय जनतेला योग्य वेळी हाच योग्य मंत्र दिला. कालपुरुषाच्या पावलांची नादलय अशा महापुरुषांनाच ऐकू येते. नव्हे, कानांचे शिंपले करून स्वभूमीचे मूक आक्रंदन ते ऐकत असतात. मग उच्चरवाने ते ‘कधीकाळी आमच्या भूमीत अंधारयुग येणारच नाही’ अशी भाबडेपणाची चादर डोईवर घेऊन निद्रिस्त झालेल्या मनाच्या लोकांना ते सांगतात, ‘अहो, दिवस उजाडला. अजून झोपा काय काढता? बाहेरच्या जगाच्या हाका नीट ऐका. त्यांना योग्य तो प्रतिसाद द्या. त्यात तुमचे जीवन आहे. नाहीतर मरण ठरलेले आहे.’ हा प्रकाशाचा संदेश आहे. मानवी संस्कृतीच्या प्रकाशमानतेचा संदेश आहे. भारतीय संस्कृती शतकानुशतके दीपोत्सवाच्या रूपाने या प्रकाशपूजनाचा संदेश देत आलेली आहे. संस्कृतीचा गाभा आपण समजून घेतला पाहिजे. नुसती बाह्यतः दीपांची आरास म्हणजे दीपावली नव्हे. अंतरीचे दीप उजळणे म्हणजे दिवाळी. अंतरंगातील मानवतेच्या ज्योती जागविणे म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणे. नाहीतर सारा अंधकारच.
भारतीयांमध्ये प्रकाशपूजनाचा हव्यास आदिम कालापासून आहे. सूर्य ही विश्वाची खरी तारक शक्ती. ती तर प्रकाशदेवता. प्राणिमात्रांचे जीवन घडविण्यासाठी ती नित्यनेमाने पृथ्वीवर अवतरते. संध्याकाळी अस्ताचलाकडे जाते.
प्राचीन काळातील ऋषिवरांनी समुचित शब्दांत या प्रकाशदेवतेची आराधना केलेली आहे ः
विश्वस्य हि प्राणनं जीवनं त्वे
वि यदुच्छसि सूनरि।
सा नो रथेन बृहता विभावरि
श्रुधि चित्रामघे हवम्
– ऋग्वेद 1/48/10 - हे (सहृदय) सुंदरी, तू जेव्हा प्रकाशतेस तेव्हा विश्वाचे प्राण आणि जीवन तुझ्या ठायी असतात.
अशी तू विशाल रथावर बसून ये
आणि विविध दानांचा वर्षाव करणाऱ्या
हे प्रकाशदेवते,
आमची हाक ऐक
या आर्त स्वरांनी केलेल्या प्रार्थनेत समष्टीच्या स्पंदनलयींचे प्रतिबिंब आहे. आपल्या संस्कृतीचा अंतर्नाद त्यात घुमताना स्पष्टपणे ऐकू येतो.
आजच्या मूल्यविवेक हरवलेल्या समाजमानसाचे लक्षच आधुनिक काळातील रवींद्रनाथांसारख्या ऋषितुल्य कवीने वेधून घेतले आहे असे वाटते.
अस्ताचली टेकलेला सांजरवी म्हणे
प्रकाशाचे दान आता कुणी हे करणे
विश्व झाले भोवतीचे भयग्रस्त मुके
निरुत्तर चराचर शब्दांना पारखे
नीरवात अशा एक मातीची पणती
हलकेच आली पुढे सांभाळीत ज्योती
आली पुढे आणि म्हणे विनयाने स्वामी
जमे तितुका प्रकाश
जगा देईन मी
रवींद्रनाथांच्या कवितेतील मातीच्या संथ, शांत आणि संयतपणे जळणाऱ्या पणतीचे प्रयोजन आपल्याला जेव्हा समजेल आणि उमजेल तो सुदिन ठरेल.
राष्ट्रकार्यासाठी सांप्रतच्या काळात प्रेरणा देणारी ही रवींद्रनाथांची कविता आहे. सध्याच्या समाजवास्तवात राष्ट्रधर्म ही संज्ञा कालबाह्य झालेली आहे. ती हास्यास्पद बाब ठरलेली आहे.
भारतवर्षात कृषिसंस्कृतीतील उत्सवाची पर्वणी ठरणारी ही दिवाळी. या दीपोत्सवी दिवसांची सुरुवात आश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारसपासून होऊन यमद्वितीया अथवा भाऊबीजेपर्यंत तो चालतो. हा उत्सव आनंदाच्या वातावरणात साजरा होतो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज साजरी करण्यामागे अनेक उपपत्ती सांगितल्या जातात. परंपरेने त्या शिरोधार्य मानलेल्या आहेत. त्यांतील प्रतीकात्मक आशय आपण नीट समजून घ्यायला हवा. अन्यायाचे परिमार्जन करणे, मांगल्याची पूजा करणे, सणासुदीच्या निमित्ताने कौटुंबिक बंध जपणे, ऐहिक सुखवर्धनाची आणि धनधान्याच्या संवर्धनाची आस बाळगणे या मूलगामी प्रेरणांमधून पाच दिवस दिव्यांची अन् आकाशदिव्यांची आरास करून प्रतीकरूपाने हा सण आनंदमय वातावरणात साजरा करणे हे आम्हा भारतीयांचे परम कर्तव्य होय. पर्यायाने आपण भारतीय नीतिमूल्यांचे संवर्धन करीत असतो. उत्सवप्रियता हा तर भारतीयांचा स्थायी भाव आहे. ही परंपरा जपली पाहिजे. या पाच दिवसांच्या उत्सवाला सांस्कृतिक मूल्य आहे. एकात्म भारतीयांच्या जीवनशैलीचे अंतःसूत्र त्यात सामावलेले आहे.
आपण सारे भारतात राहतो. पण आपले मन पूर्णांशाने भारतीय राहिले आहे का? प्रकाशपूजनाच्या प्रेरणेतून आमच्या सर्वंकष जीवनप्रणालीत प्रकाश निर्माण करण्याची ऊर्मी आता राहिली आहे का याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. तत्त्व आणि प्रत्यक्ष आचरण यांमधील विसंवाद हा भारतीय समाजाला जडलेला अभिशाप आहे. आपण आपली ज्ञानपरंपरा विसरत चाललो आहोत. वाचनप्रियतेला अन्य प्रसिद्धीमाध्यमांमुळे फार मोठा अडसर निर्माण झालेला आहे. अज्ञान म्हणजे अंधकार आणि ज्ञान म्हणजे प्रकाश हे जनमानसास पुन्हा एकदा कळायला हवे. भारतीयत्व अंगी बाणविणे ही आजच्या काळाची गरज आहे. भारताचा सर्जनात्मक आत्मा रवींद्रनाथांना नेमकेपणाने कळला होता. म्हणूनच तर या राष्ट्रात स्वातंत्र्यरवीचा उदय होण्यापूर्वी रचनात्मकतेचा, सर्जनशीलतेचा नवा अध्याय सुरू केला होता. ‘शांतिनिकेतन’ हे भारतीय उत्थानपर्वाच्या संदर्भात एक स्फूर्तिदायक ऊर्जाकेंद्र झाले होते. नालंदा, तक्षशिला आणि विक्रमशिला ही ज्ञानमय वारशाची ऊर्जाकेंद्रे सुलतानी संकटाच्या फेऱ्यात सापडली होती. पण अंतरात्म्यातील तेजोमय धून कशी लोप पावणार? ती ‘विश्वभारती’च्या रूपाने पुनरुज्जीवित झाली. ‘यत्र विश्वं भवति एक नीडम्।’ हे आर्यसत्य अधोरेखित करून विश्वधर्माचा संदेश देऊ शकली.
भारताचा आत्मा स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद सरस्वती, रमणमहर्षी, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी व बाबा आमटे प्रभृतींना कळला होता; तसाच सुदूर प्रदेशांतील शास्त्रज्ञ जे. बी. एस. हाल्डेन, चित्रकार रोरिक/रोरिच, कर्लाईल, थोरो, इमर्सन, भगिनी निवेदिता, सी. एफ. अँड्यूज ऊर्फ दीनबंधू अँड्यूज, मॅक्समूल्लर, गटे आणि वॉल्ट व्हिटमन यांनादेखील भारतीय आत्मा प्रभावित करून गेला होता.
अनेक अमेरिकन विचारवंतांप्रमाणे वॉल्ट व्हिटमन या कवीला भारताविषयी ओढ वाटत होती. जागतिक संदर्भात विचार करताना केवळ भारतच ज्ञानमय प्रकाश देऊ शकेल असा विश्वास त्याला वाटत होता. मुक्तछंदात्मक कवितेचा तो आद्य प्रवर्तक. आपल्याकडील कवी अनिलांसारख्यांनी याबाबतीत त्याच्याकडून प्रेरणा घेतली.
वॉल्ट व्हिटमनने आदिम विचाराच्या मूळ उगमाकडे- म्हणजे भारतवर्षाकडे जायला हवे असे ‘भारताचा वेध’ या आपल्या कवितेत म्हटले आहे. आम्हा भारतीयांनी त्या कवितेतील मथितार्थ समजून घ्यायला हवा… अंतर्मुख व्हायला हवे. कारण आमच्याकडे ‘दिवा’ आहे; परंतु ‘दिव्याखाली अंधार’ आहे.
सगळीच कविता अतिशय अर्थपूर्ण आहे. तरी आपल्या संस्कृतिचिंतनासाठी तिच्यातील आवश्यक तेवढाच भाग आपण पाहूया.
हे अदम्य आत्म्या, तू नि मी परस्परांचे सांगाती
आज सुरू होतंय पृथ्वीपर्यटन
माणसाचं, पुनरागमन त्याच्या मनाचं
बुद्धिवादाच्या नंदनवनात
सुज्ञतेच्या जन्माप्रत, निर्व्याज प्रज्ञानाप्रत
पुन्हा सुंदर सृजनाप्रत…
अनोख्या समुद्रावरून अनोख्या प्रदेशाकडे
जायचंय आपल्याला, आत्म्या!
वेदांच्या, संस्कृत भाषेच्या
तळाखालचा तळ गाठायचाय आपल्याला
चला, प्रस्थान ठेवा त्या दूरस्थ किनाऱ्यांच्या दिशेने
त्या सनातन अद्भुतांच्या दिशेने…
(* शंकर सारडा यांच्या ललित- दिवाळी विशेषांक 1992/पृ. 112 या वॉल्ट व्हिटमनवरील लेखातून त्याची कविता अंशतः उद्धृत)
आजच्या गतिमान युगात जागतिकीकरणाचा गजर सर्वत्र होतोय. या प्रक्रियेतून सर्वंकष जीवनातील अनेकविध घटकांची देवाण-घेवाण होत असेलही. पण सारे काही पाश्चात्त्य जगाकडूनच घेण्यासारखे आहे, भारताकडे आजच्या घडीला जगाला देण्यासारखे काही नाही ही अभावात्मक जाणीव नको. आमचा मान- आमचा अभिमान जपता आला पाहिजे.
दीपावलीच्या निमित्ताने परस्परांचे शुभचिंतन करीत असताना समांतरपणे आमच्या वारशाची आठवण ठेवणे हे आपले निजश्रेयस आहे याची जाणीव ठेवणे जरूरीचे. स्वत्वाची अन् सत्त्वाची ही आत्मखूण जपली पाहिजे. त्यासाठी पुरातन ऋषी याज्ञवल्क्य यांचे वचन मौलिक स्वरूपाचे वाटते ः
आत्मा वा अरे मन्तव्यः श्रोतव्यः निदिध्यासितव्यः।
- हे मानवा, आत्म्याच्या स्वरूपाचा विचार कर. आत्म्याच्या हाका ऐक. आत्मज्ञान हेच आपले ध्येय मान. त्याचाच निदिध्यास धर!