श्रीपाद नाईक यांना ठाम विश्वास
“मी भाजपचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. भाजपने आतापर्यंत ज्या ज्या जबाबदाऱ्या सोपविल्या, त्या सर्व समर्थपणे पार पाडण्याचे काम मी केले. गेली पंचवीस वर्षे उत्तर गोव्याचा खासदार म्हणून कार्य करताना मतदारसंघात विविध विकासकामांना चालना दिली. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत सुध्दा प्रत्येकवेळी माझ्या मतांची टक्केवारी वाढत आहे. अजूनपर्यंत अपयशी ठरलेलो नाही. केंद्रीय नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास असून, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मला पुन्हा उमेदवारी निश्चित मिळेल,” असा ठाम विश्वास केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल ‘नवप्रभा’पाशी व्यक्त केला.
उत्तर गोवा मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षांत अजूनपर्यंत आपल्याला एकाही पराभवाला तोंड द्यावे लागलेले नाही. उलट मतदारांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे प्रत्येक वेळी मताधिक्य वाढत आहे. आपला उत्तर गोवा मतदारसंघ विकासकामांच्या बाबतीत सुध्दा आघाडीवर आहे. उत्तर गोव्यातील मतदारांवर आपला पूर्ण विश्वास आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तीन महिने पूर्वी भाजपची केंद्रीय निवडणूक समिती लोकसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेईल. आगामी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्याला पुन्हा एकदा निश्चितपणे मिळेल, कारण हातात असलेली जागा पक्ष सोडणार नाही, असे ते पुढे म्हणाले. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ ही भाजपच्या हातात असलेली जागा आहे. तथापि, काही कारणास्तव आपणाला उमेदवारी न मिळाली तरीसुध्दा आपल्याला काही फरक पडणार नाही. आपले लोकसेवेचे कार्य निरंतर सुरूच राहील, अशी ग्वाहीही श्री. नाईक यांनी यावेळी दिली.
आपल्याला केंद्रात जेव्हा जेव्हा मंत्रिपद मिळाले, तेव्हा तेव्हा आपण गोव्याला त्याचा लाभ करून दिला. आयुष मंत्रालय आले, तेव्हा पेडणे तालुक्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या माध्यमातून इस्पितळ उभारण्यात आले. पर्यटन राज्यमंत्री या नात्याने स्वदेश दर्शन मोहिमेचा लाभ गोव्याला दिला. उत्तर गोवा मतदारसंघात खासदार निधीतून सामाजिक सभागृहे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आली आहेत. तसेच, अनेक गावांतील स्मशानभूमीचे मूलभूत काम मार्गी लावण्यात आले आहे. गेल्या पंचवीस वर्षातील कार्याची माहिती देणारी पुस्तिका सुध्दा आपण प्रकाशित केलेली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या विविध योजनांतून राज्यातील किनारी भागांत विविध साधनसुविधांची विकासकामे हाती घेण्यात येत आहेत, असेही नाईक यांनी सांगितले.
अंथरूण पाहून पाय पसरावेत : नाईक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घटकांकडून आपल्याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपची उत्तर गोव्यातील उमेदवारी मिळविण्यासाठी स्वतःच्या मतदारसंघात अपयशी ठरलेल्या काहीजणांनी प्रयत्न चालविलेला आहे. त्यांनी आधी अंथरूण पाहूनच पाय पसरावेत, असा इशारा श्रीपाद नाईक यांनी दिला.