विश्वजित राणेंकडून जमिनीचे रुपांतर

0
19

>> काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा आरोप

नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी गेल्या सहा महिन्यांत दोन लाख चौ. मी. जमिनीचे रुपांतर केल्याचा आरोप काल काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

भाजप नेत्यांनी नगर नियोजन कलम 17 (डी), 17 (2) व फार्महाऊस धोरण वापरून 50 हजार कोटी रु. कमावण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचा आरोपही चोडणकर यांनी यावेळी केला.
चोडणकर यांनी पुढे बोलताना, भाजप सरकार 17 (डी) (विभाग बदल), 17 (2) (प्रादेशिक आराखड्यातील त्रुटी सुधारून रुपांतरण करणे) आणि गोवा रेग्लुलेशन ऑफ लॅण्ड डेव्हलपमेंट ॲण्ड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कायदा याचा वापर करून प्रादेशिक आराखड्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून गोव्याला जर भू-माफियापासून वाचवायचे असेल तर ह्या तीन दुरूस्त्या तात्काळ मागे घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे, असे यावेळी स्पष्ट केले.

सत्तरी तालुका, डिचोली तालुका, रेईश मागुश, उसगाव, कदंब पठार, आसगाव, नेरूल, मयडे, कामुर्ली, कोळवाळ, अंजुणे, शिवोली येथील क्षेत्रीय आराखडा तयार करण्याचा निर्णय घेणाऱ्या मंडळांच्या बैठकीचे इतिवृत्तही त्यांनी वाचून दाखवले.