काही प्रश्न

0
141

दक्षिण गोव्यातील विविध धार्मिक प्रतिकांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी फ्रान्सिस झेवियर परेरा ह्या पन्नाशीतील गृहस्थाला जरी अटक केलेली असली, तरी या अटकेतून अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यांची समाधानकारक उत्तरे जोवर मिळत नाहीत, तोवर गेली पंधरा वर्षे राज्यात चाललेल्या तोडफोडीमागचे कोडे जनतेपुढे पुरते उलगडणार नाही. संशयिताला अटक होताच जनतेमध्ये पहिली प्रतिक्रिया उमटली ती अविश्वासाची. पन्नाशीचा हा गृहस्थ केवळ एकट्याने दीडशेहून अधिक धार्मिक प्रतिकांची मोडतोड करीत होता हे निव्वळ अविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. यापूर्वी घडलेल्या अशाच तोडफोड प्रकरणांत कविश गोसावी नामक युवकाला समोर आणून तोच गुन्हेगार असल्याचा दावा पोलिसांनी केेला होता. मग आता फ्रान्सिस परेरा जर ते गुन्हे आपणच केले होते असे म्हणत असेल तर कविश गोसावीला यापूर्वी या प्रकरणात का गोवले गेले होते याचा जाब आता संबंधित पोलीस अधिकार्‍यांना द्यावा लागेल. राज्य मानवी हक्क आयोगाने खरे तर यासंदर्भात त्यांना नोटीस बजावली पाहिजे. गेला महिनाभर क्रॉस, घुमटी आणि स्मशानभूमीतील थडग्यांच्या तोडफोडीच्या ज्या घटना घडल्या, त्या प्रामुख्याने दक्षिण गोव्यात घडत आल्या. पंधरा वर्षांपूर्वी अशाच प्रकारे तोडफोडीचे सत्र सुरू झाले होते आणि त्याही घटना प्रामुख्याने दक्षिण गोव्यातच घडल्या होत्या. अटक झालेला आरोपी फ्रान्सिस हा दक्षिण गोव्यातील मोरायले, कुडचडे येथील आहे आणि व्यवसायाने टॅक्सीचालक आहे आणि हे सगळे गुन्हे आपण केल्याचे तो सांगतो. परंतु केवळ तो सांगतो म्हणून या सार्‍या तोडफोडीमागे केवळ तोच होता असा सरधोपट निष्कर्ष काढता येत नाही. त्याने कबुली दिली असली, तरी केवळ त्यावर विसंबून राहणे बावळटपणाचे ठरू शकते, कारण पोलिसांपुढे दिलेली कबुली असे गुन्हेगार न्यायालयात सर्रास फिरवतात. फ्रान्सिस हाच या सगळ्या तोडफोडीमागे होता याचे पोलिसांपाशी आणखी काय पुरावे आहेत? कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये आरोपीची छबी आढळलेली नाही. त्यामुळे हे आरोप न्यायालयात कितपत टिकतील शंकाच आहे. शिवाय संशयितापाशी मनोरुग्ण असल्याचा दाखला आहे तो वेगळाच. या तोडफोड प्रकरणामागे एखादी संघटित शक्ती होती का, त्यांनी फ्रान्सिस परेराला चिथावणी दिली होती का, इतरांना पडद्यामागे ठेवण्यासाठी तो आपणच गुन्हे केल्याचे सांगत आहे का, असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे मिळाल्याखेरीज पोलिसांच्या दाव्याविषयीचा जनतेमधील अविश्वास दूर होणार नाही. त्यासाठी तपासाला थोडा अवधी द्यावा लागेल. कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी संशयित आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून या विषयाला राजकीय रंग दिला. काहींनी ‘बिलिव्हर्स’ या पंथाकडे संशयाची सुई वळवली आहे. परंतु यासंबंधीचे सत्यासत्य पोलीस तपासातूनच पुढे येऊ शकेल. आरोपी गजाआड झाल्याने यापुढे असे तोडफोडीचे प्रकार थांबतील अशी अपेक्षा आहे, परंतु पोलीस आणि सरकारविषयी अविश्वास निर्माण करण्यासाठी अशा आणखी काही घटना समाजकंटकांकडून घडविल्या जाऊ शकतात. त्यामुळे त्यासंदर्भात दक्षता आवश्यक असेल. सातत्याने धार्मिक प्रतिकांची एवढी तोडफोड होऊनही गोव्यातील धार्मिक सलोखा अभंग राहिला ही समाधानाची बाब आहे. गोव्याची ही शांततामय परंपरा आहे. ती सांभाळली गेली पाहिजे. तिला तडा देऊ पाहणार्‍या अपप्रवृत्ती डोके वर काढत असतील तर वेळीच त्यांचा बंदोबस्त केला जाणे आवश्यक आहे. सरकारने तो खमकेपणा दाखवायला हवा. देशातील बदलत्या सामाजिक वातावरणाचा परिणाम गोव्यावरही अपरिहार्यपणे होत आहे. त्यामुळे शांती, सहिष्णुता, सलोखा यांची परंपरा भंग पावून त्याची जागा सुप्त धार्मिक विद्वेष, अविश्वास आणि असहिष्णुता घेऊ पाहात आहे. अशावेळी सजग नागरिक आणि सरकार या दोहोंची जबाबदारी निश्‍चितच वाढते.