0
21

पर्वरीतील उड्डाणपुलाचे कंत्राट राजेंद्रसिंग भांबू प्रा. लिमिटेड कंपनीला

सर्वांत कमी बोली लावल्याची मंत्री काब्राल यांची माहिती

पर्वरी येथील नियोजित उड्डाणपुलाच्या कंत्राटासाठी राजेंद्रसिंग भांबू प्रा. लिमिटेड कंपनीने 364 कोटींची सर्वांत कमी बोली लावली आहे. केंद्रीय रस्ता व महामार्ग मंत्रालयाकडून या पर्वरी उड्डाण पुलाच्या बांधकामाचे कंत्राट राजेंद्रसिंग भांबू कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली.
पर्वरी भागात वाढलेल्या वाहतुकीमुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या ठिकाणी रस्ता रुंदीकरणात अनेक अडचणी निर्माण होत असल्याने उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रालयाने उड्डाणपुलासाठी सुमारे साडे पाचशे कोटीचा आराखडा तयार केला होता.
केंद्रीय रस्ता व महामार्ग मंत्रालयाने पर्वरी उड्डाणपूल आणि जोड रस्त्यासाठी निविदा जारी केली होती. पर्वरी येथे सुमारे साडेपाच किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेत सुमारे 16 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यात राजेंद्रसिंग भांबू प्रा. लिमिटेड या कंपनीने सर्वांत कमी 364 कोटी रुपयांची बोली लावली आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सर्वांत जास्त 535 कोटी रुपयांची बोली एका कंपनीने लावली आहे. सर्वांत जास्त बोली आणि सर्वांत कमी बोली यात सुमारे 172 कोटी रुपयांचे अंतर आहे. या उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबत केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाकडून निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या मान्यतेनंतर उड्डाणपुलाचे काम हाती घेतले जाणार आहे, असे बांधकाममंत्री काब्राल यांनी सांगितले.

झुवारी पुलाच्या दुसऱ्या भागाचे काम अंतिम टप्प्यात
झुवारी नदीवरील नवीन पुलावरील फिरता टॉवर बांधण्याचे कंत्राट दिलीप बिल्डकॉन कंपनीला मिळण्याची शक्यता आहे. याच दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून झुवारी पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या पुलाच्या दुसऱ्या भागाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन पुलावर पीपीपी तत्त्वावर फिरता टॉवर बांधण्यात येणार आहे. या टॉवरच्या बांधकामासाठी निविदा जारी करण्यात आली होती. एकूण चार कंपन्यांनी टॉवरच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याची माहिती मंत्री काब्राल यांनी दिली.