राज्य सरकारने 2022 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या क वर्गातील नोकरभरतीसाठी आणखी 3 महिने मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सरकारी पातळीवर सुरू झाली आहे. या नोकरभरतीसाठी येत्या 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्य सरकारच्या विविध खात्यांना क वर्गातील नोकरभरतीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती; मात्र या मुदतीत सरकारी खात्यांना क वर्गातील नोकरभरती करणे शक्य झालेले नाही. राज्य सरकारने क वर्गातील नोकरभरती करण्यासाठी राज्य कर्मचारी निवड आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाच्या माध्यमातून नोव्हेंबर 2023 पासून नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या विविध खात्यांना जानेवारी 2022 पूर्वी नोकरभरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींतील नोकरभरतीची प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली होती. आता, या नोकरभरतीसाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याने राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत होणाऱ्या नोकरभरतीला विलंब होणार आहे.
राज्यातील क वर्गातील नोकरभरतीचे प्रस्ताव कर्मचारी निवड आयोगाकडे पाठवण्याची सूचना सरकारी खात्यांना करण्यात आली आहे. त्यानंतर आयोगाकडून नोकरभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र पूर्वीची नोकरभरतीची प्रक्रिया प्रलंबित असल्याने खात्यातील रिक्त पदांबाबत माहिती सादर करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.