कांद्याच्या वाढत्या दराने डोळ्यांत पाणी

0
5

>> राज्यात दर पोहोचला 80 रुपये प्रती किलोवर

80 रुपये प्रती किलो या दरापर्यंत पोहोचलेल्या कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले असून, येणाऱ्या काळात कांद्याचे दर आणखी बरेच वाढणार असून, कांदा सर्वसामान्यांना रडवणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना एका कांदा व्यापाऱ्याने येत्या काही दिवसांत कांद्याचे दर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली.

10 दिवसांपूर्वी गोव्याच्या बाजारपेठेत कांदा 40 रुपये प्रती किलो दराने विकला जात होता; मात्र त्याचा भाव आता आता शतकाजवळ म्हणजे 80 रुपये प्रती किलो असा एकदम वर गेला असल्याचे एका किरकोळ भाजी विक्रेत्याने माहिती देताना सांगितले. दिवाळीपर्यंत कांदा शतक पार करून पुढे जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कांदा प्रती किलो 30 रुपयांच्या आसपास होता. नंतर ऑक्टोबर महिन्यांत आलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे बेळगावात कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांदा कुजला गेला. ओलसर कांदा कुजत असल्याने बेळगावातील व्यापाऱ्यांनी आपले नुकसान होऊ नये, यासाठी कांद्याची खरेदी थांबवली आहे. त्यामुळे बेळगावमध्ये कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने कांद्याचे दर वाढतच चालले आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी पावसाळा कालावधीत जून ते जुलैदरम्यान टॉमेटोचे दर 150 रुपयापर्यंत भडकले होते. आता त्याचे दर कमी झालेले असताना कांद्याचे दर वाढल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे.