आरोपी परेराची जबानी मुख्यमंत्री कशी घेऊ शकतात?

0
131

>> आम आदमी पक्षाचा सवाल

राज्यातील धार्मिक प्रतिमांची मोडतोड केल्याच्या आरोपाखाली कुडचडे पोलिसांनी अटक केलेला आरोपी फ्रान्सिस झेव्हियर परेरा यांची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगर आणि नियोजन मंत्री विजय सरदेसाई व आमदार नीलेश काब्राल यांनी जबानी घेणे हे कुठल्या कायद्यात बसते, असा सवाल काल आम आदमी पार्टीने पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
आरोपी फ्रान्सिस पेरेरा याची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मंत्री विजय सरदेसाई व आमदार नीलेश काब्राल यांनी जबानी घेतल्याचे वृत्त आहे, असे सांगून आरोपीची जबानी घेणे हे पोलिसांचे काम आहे. असे असताना वरील नेते सदर आरोपीची जबानी घेण्यासाठी कुडचडे पोलीस स्थानकात का गेले होते, असा सवाल एल्विस गोम्स, डॉ. ऑस्कर रिबेलो व वाल्मिकी नाईक यांनीही यावेळी केला.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कुठल्या कलमाखाली वरील नेत्यांना आरोपीची जबानी घेऊ दिले हे स्पष्ट करावे, अशी मागणीही एल्विस गोम्स यांनी केली.
या नेत्यांनी घेतलेल्या जबानीतून जी माहिती बाहेर आली ती कोर्टात सादर करण्यात येणार असलेल्या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात येणार आहे की ही जबानी फक्त आम आदमी पार्टी व या पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना बदनाम करण्यासाठी वापरण्यात येणार आहे हे स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणीही आपने केली आहे.