‘माझी बस’ योजनेखाली उत्तर गोव्यातही बसगाड्या ः तुयेकर

0
5

कदंबा प्रवासी वाहतूक महामंडळातर्फे माझी बस योजनेखाली दक्षिण गोव्यात आत्तापर्यत 66 खासगी बसगाड्या चालविण्यात येत आहेत. उत्तर गोव्यात माझी बस योजनेखाली खासगी बसगाड्या लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
उत्तर गोव्यातील काही खासगी बसमालकांनी कदंब महामंडळाकडे संपर्क साधलेला आहे, अशी माहिती कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष, आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

राज्यातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘माझी बस’ योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण गोव्यात माझी बस योजनेखाली खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घेऊन चालविण्यात येत आहेत. मडगाव ते काणकोण, सांगे, कुडचडे या प्रवासी मार्गावर 66 खासगी बसगाड्या चालविण्यात येत आहेत, असे आमदार तुयेकर यांनी सांगितले. उत्तर गोव्यातसुद्धा प्रवासी बसगाड्यांची संख्या कमी असल्याने वाहतुकीची समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी उत्तर गोव्यात खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घेऊन चालविण्यात येणार आहेत. असे तुयेकर यांनी सांगितले.
कदंब महामंडळाला बॅटरीमुळे नवीन 100 इलेक्ट्रिक बसगाड्या मिळण्यास विलंब झाला आहे. येत्या डिसेंबरपर्यत इलेक्ट्रिक बसगाड्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे असेही अध्यक्ष तुयेकर यांनी सांगितले.

पणजीत आठ दिवसांत इलेक्ट्रिक बसगाड्या

पणजी महानगरपालिका क्षेत्रात नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या पुढील आठवड्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तथापि, पणजीत नवीन इलेक्ट्रिक सुरू करण्याची तारीख अजूनपर्यंत निश्चित झालेली नाही. पणजी स्मार्ट सिटीअंतर्गत कदंब महामंडळाला 48 इलेक्ट्रिक मिनी बसगाड्या प्राप्त होणार आहे. त्यातील 22 इलेक्ट्रिक बसगाड्या प्राप्त झाल्या आहेत. पणजीतील रस्ते चांगले नसल्याने तूर्त या इलेक्ट्रिक बसगाड्या अन्य प्रवासी मार्गावर चालविण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.