शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सोमवार 30 रोजी एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. अपात्रतेच्या याचिका निकाली काढण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचा आक्षेप दोन्ही याचिकांद्वारे घेण्यात आला आहे. ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकांची दखल घेत मागील दोन सुनावण्यांवेळी सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकर यांची कानउघाडणी केली होती. आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी वेळेत पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना दिले होते. सुधारित वेळापत्रक देण्यासाठी 30 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल, असे त्यावेळी खंडपीठाकडून सांगण्यात आले होते.