जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल दुपारी झालेल्या एका भीषण बस अपघातात १६ अमरनाथ यात्रेकरू ठार झाले. या महामार्गावरून सदर बस घसरली व बाजूला असलेल्या खोल दरीत उलटून पडली. दुर्घटनेत २७ यात्रेकरू जखमी झाले असून त्यापैकी १९ जणांची प्रकृती गंभीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेप्रती तीव्र दुःख व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच दहशतवादी हल्ल्यात ७ अमरनाथ यात्रेकरू मृत्यूमुखी पडले होते.
रामबन जिल्ह्यातील या अपघातात मृत्यूमुखी पडलेले यात्रेकरू उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, हरयाना व मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती प्रशासकीय अधिकार्यांनी दिली. बलताल व पहलगाम येथून जम्मू काश्मीर राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांमधून ३६०० यात्रेकरू रवाना झाले होते. अपघातग्रस्त बसगाडी याच ताफ्यातील एक होती असे रामबनचे पोलीस अधीक्षक मोहन लाल यांनी सांगितले.
जखमींपैकी १९ यात्रेकरूंना विमानाने विशेष उपचारांसाठी जम्मू येथे नेण्यात आले. तर आठजणांना बनिहाल जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
दरीत पडलेल्या बसमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी व जखमींना वर आणण्यासाठी पोलीस, लष्कर यांना स्थानिकांनीही मदत केली.