घटस्थापना

0
24
  • मीना समुद्र

आपल्या प्राचीन काळात घडलेल्या देवीमाहात्म्यासाठी, तिच्याकडून तशाच प्रकारच्या शक्तिसामर्थ्याच्या वरदानासाठी, तिची उपासना करणारे नवरात्रीव्रत करण्यासाठी मानव अतीव उत्सुक बनलेला आहे. आज आश्विन शुक्ल प्रतिपदा आहे. नवरात्राच्या शुभारंभाचा हा पहिला दिवस. हाच घटस्थापनेचा पवित्र, मंगल दिवस!

जात्या पावसाची रिपरिप आता थांबली आहे. खूप काळपर्यंत- त्याची गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात आणि नंतरही रेंगाळलेली पावले आता दूर दूर गेली आहेत. कुठून कुठून मेघांनी लुटून आणलेली जलसंपदा पृथ्वीवर वर्षून आता काळे मेघ पांढरे झाले आहेत. पांढराशुभ्र कापूस पिंजत बसल्यासारखे आकाशही आता ती शुभ्रता आणि डोळ्यांना सुखद वाटणारी निळाई ल्याले आहे. सोनकेवड्याचं ऊन हळूहळू रुपेरी-चंदेरी झालं आहे आणि ते आकाशातून साऱ्या पृथ्वीवर सांडल्याने झाडापेडांतून, दगडधोंड्यांतून, नदीनाल्यांतून हास्याची प्रसन्न लकेर पसरते आहे. वाऱ्या-पावसाचा रोरावता, घोंगावता आवाज थंडावून आता झाडांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, मधुर कूजन यांनी वातावरण नादावले आहे. अवखळ झऱ्यांच्या, नद्यांच्या, जलौघांच्या पायातले चाळ, पैंजण, वाळे यांची खुळखुळही ऐकू येते आहे. झाडापेडांना आणि एकूणच साऱ्या सृष्टीला एक तजेला आणि अंतर्गत ऊर्जा मिळाली आहे. ती आनंदाने, हर्षातिरेकाने बाहेर फुटू पाहत आहे. सृष्टीचा, निसर्गाचा सृजनोत्सव चालू आहे आणि माणसाच्या मनातही असा सर्जक उल्हास भरला आहे, ओथंबला आहे, सळसळत आहे.

शरदऋतूचे हे आश्विनातले आगमन साऱ्यांनाच मोठे सुखावह वाटते. ‘सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे’ असेच वातावरण सर्वत्र आहे. या शीतल, निर्मळ, आनंददायक वातावरणात सृष्टीशी तादात्म्य साधणारा सण साजरा करावासा वाटणे अगदी साहजिक आहे. आपल्या प्राचीन काळात घडलेल्या देवीमाहात्म्यासाठी, तिच्याकडून तशाच प्रकारच्या शक्तिसामर्थ्याच्या वरदानासाठी, तिची उपासना करणारे नवरात्रीव्रत करण्यासाठी मानव अतीव उत्सुक बनलेला आहे. आज आश्विन शुक्ल प्रतिपदा आहे. नवरात्राच्या शुभारंभाचा हा पहिला दिवस. हाच घटस्थापनेचा पवित्र, मंगल दिवस! शारदीय नवरात्राचा प्रारंभ!

आपला देश कृषिप्रधान. जिकडे-तिकडे हिरवळ माजलेली आणि झाडेपेडे रंगीबेरंगी फुलाफळांनी नटलेली, सजलेली, बहरलेली. त्या सुंदर सृष्टीचे आणि आपल्या कर्तृत्वाने बहरलेल्या शेताचे प्रतीक आपल्या घरातही असावे असे आपल्याला वाटते आणि या सर्जनकाळातली शक्ती सर्वांनीच पाहावी, अजमावावी, तिचे मोल जाणावे म्हणून घरोघरी घटस्थापना केली जाते. विश्वव्यापी ईश्वराचे प्रतीक म्हणून आपण आपल्या देवघरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि त्याच्यापाशी संसारी व्यापातापातून तरून जाण्यासाठी मार्ग दाखवण्याची विनंती करतो. तसे बळ, तशी शक्ती मिळावी म्हणून श्रद्धाभक्तीने प्रार्थना करतो. तसेच ऐहिक सुखसंपन्नतेची इच्छा मनी धरून सर्वत्र शांतता, सुबत्ता नांदावी म्हणून प्रार्थनाही या घटाजवळ केली जाते. घटरूपाने सर्जकशक्ती असलेल्या देवीचीच स्थापना होते. देव्हाऱ्याशेजारी किंवा इतर कोणत्याही सुरक्षित पवित्र, स्वच्छ जागी घट पुजण्याची प्रथा आहे (घटस्थापनेसाठी एखादी थाळी, खोलगट आकाराचे भांडे घेतले जाते). चौरंगावर, पाटावर रंगीत (बहुधा लाल- जे देवीला प्रिय आहे) वस्त्र घालून त्यावर ते ताट ठेवले जाते. त्यावर केळीचे पान किंवा पत्रावळ ठेवून रानातली किंवा शेतातली चांगल्या जागेतली शक्यतो काळी माती आणून तिचा एक थर दिला जातो. गहू, बाजरी, मका, नाचणी, मूग, ज्वारी अशी धान्ये-कडधान्ये मातीवर विखरून किंवा अंतरावर टोचून त्यावर थोडे पाणी शिंपडले जाते. त्यावर मातीचा आणखी एक पातळ थर भुरभुरला जातो. त्यावर पाणी शिंपडून तिसरा मातीचा पातळ थर दिला जातो. माती किंचित ओलसर आणि कोरडी असावी. अगदी गच्च बसणारी चिकणमातीसारखी चालत नाही. धान्य अंकुरून यायला वाव असेल अशीच ही माती हवी. मग त्याच्या मध्यावर एक तांब्या-पितळेचा किंवा मातीचा कलश ठेवतात. कलशात पाणी भरून सुपारी, नाणे, दूर्वा , तुळशी घातलेल्या असतात. कलशाला विड्याची किंवा आंब्याची पाने तोंडाशी खोचून त्यावर श्रीफळ ठेवले जाते. ताट, कलश, नारळाला हळदीकुंकू लावतात. कलशावर हळदीकुंकवाचे पट्टे ओढलेले असतात. कधी त्यानेच स्वस्तिक काढतात. मग या घटाला दूर्वा-फुले वाहिली जातात. आणि त्यावर विड्याच्या पानांची किंवा झेंडूच्या फुलांची रोज एक अशी नऊ दिवस माळ सोडली जाते. शेजारी अष्टदल अशा तांदळाच्या कमळावर अखंडदीप किंवा नंदादीप ठेवलेला असतो. यातली समई किंवा मोठे निरांजन सव्वाहात वात ओवून तेलाने भरून ठेवले जाते. काच घालून किंवा आडोसा करून ज्योत शांत होऊ नये याची काळजी घेतली जाते. दिव्याची काजळी हळुवारपणे काढली जाते. हा दिवा म्हणजे नंदादीप. तो अखंड नऊ दिवस तेवता ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. तो दिवा मातीचाही असू शकतो. हा अखंडदीप शांतपणे तेवताना त्याची ऊब, ऊर्जा आणि उजेड घेऊन मातीपाण्यात पेरलेल्या घटातील बीजे अंकुरतात आणि अगदी हलक्या हाताने रोज केलेल्या जलसिंचनाने सरासर वाढतात. घट सुंदर तजेलदार हिरवाईने भरून जातो. त्याच्या कमी-जास्त उगवण्यावर माणसाची संपन्नतेची स्थिती अवलंबून असते; घराची भरभराट आणि उन्नती अवलंबून असते असे मानले जाते. घटावरील श्रीफळाला हळदीकुंकवाचा मळवट भरून दागिन्यांनी सजविले जाते. काही ठिकाणी देवीचे मुखवटे कलशावर ठेवून मुकुट, कानात-गळ्यात दागिने घालून, नथ घालून साजशृंगार केला जातो. देवीचे असे कोणतेही रूप अतिशय साजरे-गोजरेच दिसते आणि तिच्या ठायी श्रद्धा-भक्ती-प्रीती मनात जागते. घरातले देव किंवा देवदेवतांचे टाक विड्याच्या पानावर ठेवून पुजण्याची ही प्रथा आहे आणि घटस्थापनेपासून नऊ दिवस अशी पूजा करून दहाव्या दिवशी महिषासुरावर विजय मिळवलेल्या महिषासुरमर्दिनीचा विजय विजयादशमी किंवा दसऱ्याला साजरा करताना घर आंब्याच्या पानाच्या तोरणांनी आणि झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजविले जाते. नवव्या दिवशी खंडेनवमीला शस्त्रास्त्रपूजा, अष्टमीला कुमारीपूजन, पंचमीला ललितापंचमी असे विशेष दिवसही नवरात्राचे मानले जातात. दसऱ्याला ग्रंथपूजा, सरस्वतीपूजा करून आपट्याची पाने सोने म्हणून लुटताना घटातले धान्यतुरेही लुटतात. देवांना वाहतात आणि डोक्यातही घालतात. घटस्थापनेची सर्जक आणि प्रेरक शक्ती आणि शारदीय नवरात्रातल्या नवदेवतांच्या उपासनेचा आशीर्वाद यामुळे माणसाचे मन हर्षोत्फुल्ल, ताजेतवाने होते आणि कार्यमग्न होते. दांडिया-गरबाच्या खेळातून, रासातून आणि सरस्वतीपूजेतून होणाऱ्या ज्ञानोपासनेतून आणि विविधकला दर्शनातून नवरात्र आपली आत्मशक्ती जागवते. नवरात्रीचे हे नवजागरण सर्वांना सुखदायी होवो.