गाझाच्या उत्तर भागातील जवळजवळ अकरा लाख लोकांना चोवीस तासांच्या आत दक्षिणेकडे निघून जाण्यास फर्मावून इस्रायलने गाझापट्टीचा भौगोलिक चेहरामोहरा कायमचा बदलून टाकण्याच्या दिशेने निर्णायक हालचाली सुरू केलेल्या दिसतात. इस्रायलने आपले शेकडो रणगाडे आणि चिलखती वाहने त्यासाठी गाझाच्या उत्तरेच्या भागाच्या दिशेने रवाना केली आहेत. त्यामुळे हमास आणि इस्रायलमधील ह्या युद्धाला अधिक भीषण स्वरूप प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हमास गाझामध्ये गेली सतरा वर्षे सत्तेत आहे. या काळात आपला हाडवैरी इस्रायलशी लढण्यासाठी सर्वतोपरी मोर्चेबांधणी त्यांनी आजवर केलेली होती. गाझा मेट्रो संबोधले जाणारी जमिनीखालील भुयारे काय, देशी बनावटीच्या हजारो क्षेपणास्त्रांचे उत्पादन काय, नुख्बा फोर्ससारख्या खास प्रशिक्षित सैनिकी तुकड्या काय, हमासने इस्रायलशी सतत चालणाऱ्या संघर्षाचा मुकाबला करण्यासाठी आजवर भरपूर रसद करून ठेवलेली आहे हेच या युद्धात दिसून आले. इस्रायल गेला आठवडाभर अहोरात्र बॉम्बवर्षावाने आणि क्षेपणास्र हल्ल्याने भाजून काढत असूनही अद्याप हमासचा पाडाव झालेला नाही. सतत आम नागरिकांची ढाल करून लढत असल्यामुळे आणि ह्या सगळ्या जय्यत तयारीमुळेच तर आतापर्यंत हमासचा निभाव लागला आहे. केवळ हवाई लढाईने हमासचा नायनाट शक्य नाही हे इस्रायलही जाणून आहे. मात्र, आजवर प्रत्यक्ष जमिनीवरच्या लढाईपासून इस्रायल मागे राहत आले होते, कारण त्यामध्ये उभयपक्षी मोठी प्राणहानी होऊ शकते. सात ऑक्टोबरच्या हल्ल्याने मात्र सगळे निर्बंध मोकळे करून इस्रायल आयसिससदृश्य हमासच्या कायमच्या नायनाटासाठी आता थेट गाझामध्ये घुसायला निघाले आहे. मुळात संपूर्ण गाझापट्टीच जेमतेम पंचेचाळीस किलोमीटरची आहे. काही ठिकाणी तिची रुंदी कमीत कमी सहा किलोमीटर, तर जास्तीत जास्त बारा किलोमीटर एवढीच आहे. उत्तर गाझा, गाझा शहर, मध्य भाग, खान युनीस आणि राफाह असे गाझापट्टीचे पाच भाग पडतात. संपूर्ण सीमेवर इस्रायलची लोखंडी भिंत असल्याने बाहेर पडण्याचे केवळ दोनच मार्ग आहेत, ज्यातील उत्तरेचे एरेझ क्रॉसिंग इस्रायलच्या, तर दक्षिणेचे राफा क्रॉसिंग ईजिप्तच्या ताब्यात आहे. पश्चिमेला भूमध्य सागर आहे, जो इस्रायलच्या ताब्यात आहे. गाझामधील एकमेव विमानतळ इस्रायलने पूर्वीच निकामी केलेला आहे. जमिनीवरील सीमाच नव्हे, तर सागरी आणि हवाई हद्दही इस्रायलच्या अमलाखाली आहे. अशा परिस्थितीत 24 तासांत चालते व्हायला सांगितलेले उत्तर गाझामधील हे नागरिक जाऊन जाऊन जाणार कुठे? त्यांना दक्षिणेच्या भागाकडे निघून जाण्यास इस्रायलने फर्मावले आहे, कारण आत घुसून हमासने आजवर बांधलेले भुयारांचे जाळे आणि तळ त्याला कायमचे उद्ध्वस्त करायचे आहेत. इस्रायल हा ठरवतो ते करून टाकतो हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे त्याला थोपवण्यासाठी आता हमासची भिस्त सगळ्या कडव्या इस्लामी देशांवर आणि दहशतवादी संघटनांवर दिसते. काल शुक्रवारी ठिकठिकाणच्या नागरिकांना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ बाहेर पडण्याचे आणि इस्रायलला भिडलेल्या लेबनॉन, सीरिया, जॉर्डन, ईजिप्त आदी देशांतील पॅलेस्टाईन समर्थक नागरिकांना इस्रायलच्या सीमेला धडक देण्याचे आवाहन हमासने केले होते. हिजबुल्ला, इस्लामी जिहाद आदी समविचारी दहशतवादी संघटनांनी आणि पॅलेस्टाईन समर्थकांनी इस्रायलच्या उत्तर सीमेवर आघाडी उघडण्याचाही प्रयत्न केला. जरी अरब देशांनी वेढलेले असले तरी सध्याच्या परिस्थितीत इस्रायलशी थेट संघर्ष करायची त्यातल्या कोणत्याही देशाची प्राज्ञा नाही. सर्वांना अमेरिकेचा धाक आहे. एकेकाळी पाच अरब देशांनी इस्रायलवर एकत्र हल्ला चढवला होता. योम किप्पुरच्या युद्धात ईजिप्त, सिरिया मिळून लढले होते. आज मात्र सर्वांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. सौदी अरेबियाला अमेरिकेने इस्रायलच्या जवळ आणले आहे. जॉर्डन, ईजिप्तसारखे एकेकाळी इस्रायलशी लढलेले देश आज मध्यस्थीस पुढे सरसावत आहेत. हमासला पाठबळ असलेल्या इराणला अमेरिकेने जरब बसवली आहे. संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संघटना कागदी वाघ बनून राहिल्या आहेत. हे युद्ध असेच चालले तर कितीतरी पटीने रक्तपात अटळ आहे. शिवाय हमास – इस्रायल युद्ध आता केवळ गाझापुरते सीमित उरणार नाही. येणाऱ्या काळात इस्रायली नागरिकांना जगाच्या कानाकोपऱ्यात लक्ष्य केले जाऊ शकते. काल चीनच्या राजधानीत इस्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्याला भोसकण्यात आले. असे लोन वूल्फ प्रकारचे हल्ले वाढू शकतात. इस्रायली पर्यटकांची वर्दळ असलेल्या भारतातही अशा हल्ल्यांची शक्यता नाकारता येत नाही.