>> ठराव संमत; काँग्रेस नेते ॲड. गावकर यांची माहिती
पेडणे तालुक्याच्या क्षेत्रीय आराखड्याला तालुक्यातील जनतेचा पूर्ण विरोध असून, पेडणे तालुक्यातील 11 पंचायतींनी हा आराखडा आम्हाला नको व तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव संमत केला आहे, असे काँग्रेस नेते ॲड. जितेंद्र गावकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. 11 पंचायतींनी घेतलेल्या ठरावांचा मान राखून नगरनियोजनमंत्री विश्वजजीत राणे यांनी हा आराखडा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
पेडणे हा शेतीप्रधान असा तालुका असून, तो ‘सुजलाम सुफलाम’ असा तालुका आहे. पेडण्यातील 1.4 कोटी चौरस मीटर जमीन कुणासाठी निवासी विभाग म्हणून रुपांतरित करण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा सवालही ॲड. गावकर यांनी केला.
आराखड्याच्या प्रश्नी केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे राणे जे म्हणत आहेत, त्याला आमचा तीव्र विरोध असून गोव्यासंबंधीचा हा महत्त्वाचा असा निर्णय राज्य सरकारनेच घ्यायला हवा, असेही ॲड. गावकर यांनी नमूद केले.
पेडण्यात आयुष इस्पितळ उभे झाले; पण पेडण्यातील लोकांना तेथे रोजगार मिळालेला नाही. मोपा विमानतळावरही पेडणेकरांना नोकऱ्या मिळाल्या नसून, पेडण्यातील टॅक्सीवाल्यांनाही ह्या विमानतळावर काऊंटर मिळाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
सरकारला पेडणेवासीयांविषयी चिंता नसून सरकारने तेथील कुळांचा प्रश्न भिजवत ठेवला आहे आणि आता आराखडा तयार करून पेडणे तालुका परप्रांतीयांना आंदण देण्याचा सरकारचा कुटिल डाव आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी सांगितले. पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचा बंगला बेकायदेशीर असल्याचा आरोपही बर्डे यांनी केला. काँग्रेसचे उत्तर गोव्याचे सरचिटणीस प्रणव परब यांनीही भाष्य केले.