पेडण्याचा आराखडा रद्दच करा : तृणमूल

0
34

पेडणे तालुक्याचा वादग्रस्त क्षेत्रीय आराखडा स्थगित करून प्रश्न सुटणार नसून, हा आराखडा रद्द करण्यात यावा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो व पक्षाचे संयुक्त संयोजक समिल वळवईकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ह्या आराखड्यासाठी सल्लागाराला दिलेले कंत्राटही रद्द करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

पेडण्यातील हरित क्षेत्र असलेल्या 1.4 कोटी चौरस मीटर जमिनीवर सरकारची वक्रदृष्टी असून, तेथे काँक्रिटचे जंगल उभारण्याचा कट आहे आणि त्यासाठीच ह्या हरित क्षेत्राचे रुपांतर सरकार लोकवस्तीत करू पाहत असल्याचा आरोप डिमेलो व वळवईकर यांनी पुढे बोलताना केला.
पेडणेतील एकूण 25.2 कोटी चौरस मीटर क्षेत्रापैकी प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये 2.9 कोटी चौरस मीटर एवढे क्षेत्र हे लोकवस्ती क्षेत्र म्हणून आरेखित केले असून, 6.8 कोटी चौरस मीटर हे हरित आवरण क्षेत्र म्हणून संरक्षित केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने लोकांचा विरोध असताना हा विभाग आराखडा लागू करण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला मोठ्या जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी डिमेलो यांनी दिला.